राजापूरला पुराच्या पाण्याचा वेढा
By Admin | Updated: July 16, 2014 01:05 IST2014-07-16T01:03:01+5:302014-07-16T01:05:09+5:30
दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी

राजापूरला पुराच्या पाण्याचा वेढा
राजापूर : दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने राजापूर शहराला आज, मंगळवारी पुराच्या पाण्याने वेढा घातला. या पावसामुळे व्यापाऱ्यांना काल, सोमवारची रात्र जागून काढावी लागली. दुपारपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्याने जवाहर चौकातील पाणी ओसरू लागले होते. तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असून, कुठे नुकसान झाल्याची घटना घडलेली नाही.
गुरुवारपासून पावसाने जोर धरला असून, सर्वत्र पावसाची दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे नद्या, नाले, ओढे, वहाळही पाण्याने भरून वाहत आहेत. दणक्यात पडणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून आणखीच जोर धरला. त्यामुळे पुराच्या भीतीने शहरातील समस्त व्यापाऱ्यांसह नदीकाठच्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. अनेक व्यापाऱ्यांनी आपला माल सुरक्षित स्थळी हलवला. आज सकाळपासून जवाहर चौकात पाणी वाढू लागले. त्यामुळे राजापूर एस. टी. आगाराकडून शहराकडे होणारी प्रवासी वाहतूक बंद होती. अन्य वाहतूक मात्र सुरू होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुराच्या पाण्याने जवाहर चौकाला वेढा दिला होता. पाणी पुढे सरकण्याच्या भीतीने उरल्यासुरल्या व्यापाऱ्यांनीही आपला माल सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली. सुदैवाने पावसाचा जोर थोडा कमी झाला आणि जवाहर चौकाभोवती आलेले पाणी हळूहळू कमी होऊ लागले होते.
आज सकाळी पाण्यामुळे बंद केलेली राजापूर एस. टी. आगाराची सेवा दुपारनंतर जवाहर चौकापर्यंत पूर्ववत सुरू झाली होती. काल सकाळपासून आज सकाळपर्यंत राजापूर तालुक्यात ११९.८२ मिलिमीटर (सुमारे साडेचार इंच) पावसाची नोंद झाली. (प्रतिनिधी)