छत्रपती संभाजीनगर : शहराचा पारा ३९ अंशापर्यंत जाताच नो नेटवर्क एरिया (ज्या भागात जलवाहिन्या नाहीत) मध्ये पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे. सध्या ८५ पेक्षा अधिक वसाहतींमध्ये ८३ टँकरद्वारे ४८० फेऱ्या केल्या जात आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात टँकरची संख्या, फेऱ्याही वाढतील. जायकवाडीहून शहरात वाढीव पाणी आल्यानंतर काही वसाहतींना दिलासा मिळू शकतो.
महापालिकेने शहराच्या आसपास नवीन वसाहतींमध्ये मागील २५ वर्षात जलवाहिन्याच टाकल्या नाहीत. या भागात राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी दोन स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात आले. दोन कंत्राटदारांचे सध्या ८३ टँकर कार्यरत आहेत. सातारा-देवळाईसह निसर्ग कॉलनी पडेगाव, मिटमिटा, जालना रोडवर चिकलठाणा, हिनानगर, केम्ब्रीजपर्यंतच्या ८५ पेक्षा अधिक वसाहतींना पाणी देण्यात येत आहे. नारेगाव, ब्रीजवाडी, हर्सूल, पहाडसिंगपुरा आदी भागातही पाणी देण्यात येत आहे. नागरिकांना एक ग्रुप तयार करून ॲडव्हान्समध्ये पाण्यासाठी पैसे भरावे लागतात. एका फेरीत एक किंवा दोन ड्रम पाणी दिल्या जाते. आठवड्यातून दोनदा हे पाणी नागरिकांना मिळते. एन-७, कोटला कॉलनी, नक्षत्रवाडी जलकुंभावरून कंत्राटदारांचे टँकर भरले जातात. पहाटे ४ वाजता टँकर भरण्यास सुरुवात होते. रात्री १० वाजेपर्यंतही काही ठिकाणी टँकर भरले जातात. ४८० पाण्याच्या फेऱ्या पूर्ण करण्यासाठी दररोज अडीच ते तीन एमएलडी पाणी लागते.
उन्हाळ्यापूर्वी ८० टँकरद्वारे दररोज ४१५ फेऱ्या करण्यात येत होत्या. उन्हाळा सुरू होताच टँकरची मागणी वाढली. सातारा-देवळाई आणि शहरापासून लांब असलेल्या वसाहतींमध्ये विंधन विहिरींनाही पाणी नाही. त्यामुळे त्या भागातील नागरिक पैसे भरून टँकर द्या, अशी मागणी मनपाकडे करीत आहेत. टँकरवरील ताण आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे.
वाढीव पाणी आले तर...शहरात ज्या भागात जलवाहिन्या नव्हत्या, त्या भागात नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत १,२०० किमी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवसात अतिरिक्त २०० एमएलडी पाणी आले तर नो नेटवर्क एरियामधील वसाहतींनाही पाणी मिळेल. कारण महापालिकेकडे पाणी साठवून ठेवण्यासाठी जलकुंभ नाहीत.
मागणी दरवर्षी वाढतेदरवर्षी उन्हाळ्यात टँकरची मागणी खूपच वाढते. मागणीच्या तुलनेत पाण्याचा पुरवठा करणे मनपाला अनेकदा अशक्य होते. त्यानंतरही आता फेऱ्या वाढवून नागरिकांना पाणी दिल्या जात आहे.- किरण धांडे, उपअभियंता, मनपा.
Web Summary : As temperatures rise, Sambhajinagar faces water scarcity. Eighty-five settlements rely on 83 tankers making 480 trips. The municipality failed to install pipelines in new settlements, leading to increased tanker dependence. Additional water supply from Jayakwadi may offer relief.
Web Summary : तापमान बढ़ने के साथ, संभाजीनगर में पानी की कमी हो रही है। पचासी बस्तियाँ 83 टैंकरों पर निर्भर हैं जो 480 चक्कर लगा रहे हैं। नगरपालिका नई बस्तियों में पाइपलाइन स्थापित करने में विफल रही, जिससे टैंकरों पर निर्भरता बढ़ गई। जायकवाड़ी से अतिरिक्त पानी की आपूर्ति से राहत मिल सकती है।