अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट
By Admin | Updated: September 4, 2016 01:05 IST2016-09-04T01:00:52+5:302016-09-04T01:05:33+5:30
औरंगाबाद : सलग चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे.

अपुऱ्या पावसामुळे पाणीटंचाईचे सावट
औरंगाबाद : सलग चार वर्षांपासून दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यात यंदाही पावसाचे प्रमाण कमीच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ६२ टक्के इतका पाऊस झाला आहे. त्यातही गंगापूर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे केवळ ४१ टक्के इतक्या पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे कोरड्या पडलेल्या विहिरी आणि विंधन विहिरींना अजूनही पाणी आलेले नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्रामीण भागावर टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे जायकवाडी धरणात आतापर्यंत ६५ टक्के उपयुक्त साठा झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. असे असले तरी ग्रामीण भागात मात्र, यंदाही टंचाईचे सावट आढळून येत आहे. जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६७५ मि. मी. इतकी आहे. परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी केवळ ४२२ मि. मी. इतकाच पाऊस झाला आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ६२ टक्के एवढे आहे.
पैठण तालुक्यातही केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. तर सोयगाव तालुक्यात ५८ टक्के आणि खुलताबाद तालुक्यात ६० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पाऊस हा औरंगाबाद तालुक्यात झाला आहे. त्यापाठोपाठ ७२ टक्के पाऊस सिल्लोड तालुक्यात पडला आहे. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठे जलसाठे अजूनही रिकामेच आहेत. याशिवाय विहिरींनाही पुरेसे पाणी आलेले नाही. त्यामुळे पाणीसाठ्याची मदार आता परतीच्या पावसावरच अवलंबून आहे.