दुष्काळी स्थितीत पाण्याची टंचाई
By Admin | Updated: August 17, 2014 00:15 IST2014-08-17T00:15:32+5:302014-08-17T00:15:32+5:30
सेनगाव : अत्यल्प पावसामुळे सेनगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून त्याचे चटके जाणवू लागले आहेत.

दुष्काळी स्थितीत पाण्याची टंचाई
सेनगाव : अत्यल्प पावसामुळे सेनगाव तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून त्याचे चटके जाणवू लागले आहेत. पाणीपातळी खालावल्याने जलसंकट उभे टाकले आहे. सद्य:स्थितीत सेनगावात तीन ते चार दिवसाआड जेमतेम पाणीपुरवठा होत आहे.
पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कमी झाल्याने सेनगावला तीन ते चार दिवसाआड केवळ पाच-दहा मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा योजनेप्रमाणे खासगी बोअर, हातपंपही कोरडे पडले आहेत. गावातील एकूण ४० शासकीय पैकी २० हातपंप कायम बंद आहेत. तर १० हातपंप पाण्याअभावी बंद पडले आहेत.
दहा हातपंपातून अल्पसा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची झळ आॅगस्ट महिन्यातच बसत असून अशीच स्थिती कायम राहिली तर पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई उपाय योजनेकरिता पंचायत समितीकडे पर्यायी उपाययोजनांची मागणी करीत बोअर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाकडून ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी ग्रामस्थांना पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे़ परिणामी पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)