नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा..!
By Admin | Updated: November 28, 2014 01:10 IST2014-11-28T00:16:18+5:302014-11-28T01:10:46+5:30
भूम : तालुक्यात यंदाही ऐन हिवाळ्यात काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, सध्यस्थितीत पंचायत समितीकडे वालवड येथील

नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा..!
भूम : तालुक्यात यंदाही ऐन हिवाळ्यात काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून, सध्यस्थितीत पंचायत समितीकडे वालवड येथील ग्रामपंचायतीने टँकरसाठी तर वारेवडगाव ग्रामपंचायतीने विहीर अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. येणाऱ्या काळात टंचाई परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यताही जलस्त्रोतांमधील उपलब्ध साठ्यावरून दिसून येत आहे.
तालुक्यात यंदा काही बोटावर मोजण्याइतपत मध्यम, लघु प्रकल्पात मुबलक पाणीसाठा झाला असला तरी बहुतांश प्रकल्पात अत्यल्प साठा आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासूनच अनेक गावांत पाणीटंचाईचे सावट गडद होत असल्याचे चित्र आहे. वालवड, अंभी सर्कलमध्ये सध्या पाणीप्रश्श्न गंभीर झाला आहे. वालवड येथील ग्रामपंचायतीने २० नोव्हेंबर रोजीच टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केला आहे. याशिवाय वारेवडगाव येथील पाणीपुरवठा विहिरीनेही तळ गाठला असल्यामुळे विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. दरम्यान, वालवड येथे सध्या आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना घागरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, येथे टँकर सुरु करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)४
तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झालेला असल्याने याच अनुषंगाने आॅक्टोबर ते जून २०१५ या कालावधीसाठीचा २ कोटी ४७ लाख रूपयांचा टंचाई कृती आराखडा यापूर्वी पंचायत समितीने तयार करून पाठविला आहे. परंतु, वरिष्ठांच्या सूचनेनुसार पाणीटंचाईबाबत पुन्हा आढावा बैठक घेऊन येणाऱ्या मागणीनुसार सुधारित आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे गटविकास अधिकारी टी. बी. उगलमुगले यांनी सांगितले.
केवळ ४४३ मिमी पाऊस
४तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ९०६ असली तरी यंदाच्या पावसाळ्यात केवळ ४४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्कलनिहाय आकडेवारी पाहता तालुक्यातील वालवड सर्कलमध्ये ३२५ मिमी, अंभी ३४३, माणकेश्वर ४७६, ईट ४३९ तर भूम सर्कलमध्ये ६६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.