वाळूज महानगरात यंदा पाणीटंचाईचे संकट टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:05 AM2021-05-06T04:05:42+5:302021-05-06T04:05:42+5:30

: लॉकडाऊनमुळे टँकर चालकांचा व्यवसाय बुडाला लोकमत न्यूज नेटवर्क वाळूज महानगर : गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा वाळूज महानगरातील ...

Water scarcity crisis was averted in Waluj metropolis this year | वाळूज महानगरात यंदा पाणीटंचाईचे संकट टळले

वाळूज महानगरात यंदा पाणीटंचाईचे संकट टळले

googlenewsNext

: लॉकडाऊनमुळे टँकर चालकांचा व्यवसाय बुडाला

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळूज महानगर : गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदा वाळूज महानगरातील पाणीटंचाईचे संकट टळल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मुबलक जलसाठा आणि शहरात लॉकडाऊन असल्याने उद्योग नगरीतील टँकर चालकांचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे.

वाळूज महानगर परिसरातील वाळूज, जोगेश्वरी, घाणेगाव, विटावा, साजापूर, तीसगाव, वडगाव आदी ठिकाणी दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडते व नागरिकांना पदरमोड करुन जार अथवा टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते. ग्रामपंचायतीकडून खासगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण तसेच टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावात पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जलसिंचन प्रकल्प काठोकाठ भरुन विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. वाळूज परिसरातील शेतकरी व नागरिकांसाठी वरदान ठरलेला टेंभापुरी मध्यम प्रकल्पही दशकभरानंतर गतवर्षी १०० टक्के भरला होता. याशिवाय वडगाव, साजापूर, करोडी, तीसगाव या भागातील पाझर तलावांतही अपेक्षित जलसाठा झाल्याने या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी व सिंचनासाठी सुरु झाला होता. सध्या कडक उन्हाळा सुरु असला, तरी या भागातील पाझर तलाव, टेंभापुरी प्रकल्प व विहिरींत मुबलक जलसाठा असल्याने किरकोळ अपवाद वगळता परिसरात सर्वत्र पाणीपुरवठा सुरळीत सुरु आहे. यावर्षी उन्हाळ्यात वाळूज महानगरातील पाणीटंचाईचे संकट टळल्याने ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने वाळूज महानगरातील टँकर चालकांचा व्यवसाय मात्र बुडाला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईमुळे टँकर चालकांची सुगी असते. व्यवसाय चांगला होतो. औद्योगिक परिसरात ३००च्या आसपास टँकरचालक असून, उद्योगनगरीत नवीन बांधकामे, कंपन्यांमध्ये तसेच नागरी वसाहतीत मागणीनुसार टँकरने पाणीपुरवठा हे चालक करत असतात. पाच हजार लीटरच्या टँकरसाठी ५०० ते ७०० रुपये तर १२ हजार लीटरच्या टँकरसाठी १५०० ते २००० हजार रुपये टँकरचालक घेतात. सध्या लॉकडाऊनमुळे नवीन बांधकामे बंद असून, हॉटेल व व्यवसाय बंद असल्याने टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे, असे उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करणारे टँकरचालक कमलसिंग सूर्यवंशी, के. के. पटेल, के. एस. निमोने, संदीप गायके, केशव गायके, लखन सलामपुरे आदींचे म्हणणे आहे.

-------------------------------------

Web Title: Water scarcity crisis was averted in Waluj metropolis this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.