नळ दुरुस्तीतून पाणी बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 00:08 IST2016-05-13T00:05:20+5:302016-05-13T00:08:27+5:30
औरंगाबाद : एकीकडे ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना कोसो मैल पायपीट करावी लागत आहे, तर दुसरीकडे शहरात नळांच्या तोट्या खराब असल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.

नळ दुरुस्तीतून पाणी बचत
औरंगाबाद : एकीकडे ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांना कोसो मैल पायपीट करावी लागत आहे, तर दुसरीकडे शहरात नळांच्या तोट्या खराब असल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे.
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मोल काय असते, हे ज्यांच्यावर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ आली; तेच सांगू शकतील. तोटीचे ओटे खराब झाल्याने रस्त्यावर शेकडो लिटर पाणी वाहून जात असतानाही त्या नळमालकाच्या ‘हृदयाला’ पाझर फुटत नसल्याने अखेर आता जलसाक्षरतेसाठी जलमित्र समोर आले आहेत. ज्यांच्याकडील नळाची तोटी खराब असेल, पाईपमधून पाणी गळत असेल, अशा नागरिकांनी जर या जलमित्रांना फोन केला तर हे जलमित्र येऊन कोणतेही शुल्क न घेता ते दुरुस्त करून देत आहेत.
दुष्काळ भूतकाळ ठरावा, शहरवासीयांनी पुढाकार घेऊन पाणी बचतीला स्वत:पासून सुरुवात करावी, हा आदर्शवाद कागदावर व व्हॉटस् अॅपवरच दिसून येतो. प्रत्यक्षात ज्या दिवशी त्या भागात नळाला पाणी येते तिथे फेरफटका मारला असता रस्तोरस्ती शेकडो लिटर पाणी वाया गेल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे अनेक घरांसमोरील नळांना तोट्याच नाही. काही ठिकाणी तोट्यांचे ओटे खराब झाल्याने पाण्याची गळती होते. मोटारपंपाचे पाईप चिरल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते. छोट्या कामासाठी प्लंबर मिळत नाहीत, ही ओरडही होत असते. शेकडो लिटर पाणी वाया जाऊ नये, यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मनसेचे शहर अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आवाहन केले आहे की, नळाची तोटी खराब आहे, तिची दुरुस्ती होत नसल्याने शेकडो लिटर पाणी वाहून जात आहे. दुरुस्तीअभावी जर पाणी वाया जात असेल तर हे दुर्दैव आहे. यासाठी आम्ही प्लंबरचे पथक तयार केले आहे.
नादुरुस्त नळातील पाणी गळती थांबविण्यासाठी घरमालकांनी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान आपली नावनोंदणी औरंगपुरा येथील नाथ मंदिराशेजारी असलेल्या ‘राधामोहन-चविष्ट’ येथे करावी. तसेच ९७६४७७३७७७ या नंबरवर संपर्क साधावा. घरमालकांनी साहित्य विकत आणावे. तोटी बसविणे व दुरुस्तीचे काम विनामूल्य करण्यात येईल.
प्लंबिंग असोसिएशन तयार करणार शोषखड्डे
प्लंबिंग वेलफेअर असोसिएशनतर्फे ज्या कॉलनीत मोकळ्या जागेत किंवा कोपऱ्यात पावसाचे पाणी साठत असेल, तेथे शोषखड्डे तयार करण्यात येणार आहेत. जेणेकरून पावसाचे पाणी वाया न जाता ते जमिनीमध्ये मुरेल. तसेच संघटनेतर्फे रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी जनजागृती केली जात आहे.
यासाठी ४२ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. यासंदर्भात सचिव बाळासाहेब भोसले यांनी सांगितले की, रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे १ हजार स्क्वेअर फूट प्लॉटवर २० हजार लिटर पाणी आपण वाचवू शकतो. ही जनजागृती करीत असतानाच आमचे सदस्य ज्या नळांना तोट्या नाही, तेथे त्या मालकाने तोट्या दिल्यास त्या बसवून देण्याचे काम विनामूल्य करण्यात येईल.
यासाठी अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, श्रीरंग फरकाडे, आशुतोष मलिक, वाजिद सिराज, शिवाजी जवरे, गणेश जाधव, बबन खरात, गंगाधर राजने, संतोष कुमावत, देवानंद खरात, संतोष म्हस्के, नरसिंग भारती, किरण नवतुरे, प्रकाश हेकाडे, चंद्रशेखर कुबेर आदी परिश्रम घेत आहेत.
पाण्याचा काटकसरीने वापर करून त्याची बचत करणे सध्याच्या परिस्थितीत नितांत गरज आहे. पाणी बचतीबाबत जनजागृती करण्यासाठी ‘लोकमत’ने ‘जलमित्र अभियान’ सुरू केले आहे. पाणी बचतीसाठी तुम्ही नवनवीन कल्पना राबवीत असाल, तर आपले अनुभव आम्हाला ९८८१३००४९४, ९८८११९७३९८ या क्रमांकावर कळवावेत.