जलयुक्तच्या निधीचे अजूनही नियोजन नाही
By Admin | Updated: December 17, 2015 23:48 IST2015-12-17T23:44:31+5:302015-12-17T23:48:07+5:30
हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या नियोजनासाठी वारंवार बैठका होत असल्या तरी प्रत्यक्षात गतवर्षी निवडलेल्या गावांत यंदा कोणती कामे घ्यायची, याचे अद्याप काहीच नियोजन नाही.

जलयुक्तच्या निधीचे अजूनही नियोजन नाही
हिंगोली : जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या नियोजनासाठी वारंवार बैठका होत असल्या तरी प्रत्यक्षात गतवर्षी निवडलेल्या गावांत यंदा कोणती कामे घ्यायची, याचे अद्याप काहीच नियोजन नाही. गतवर्षीचे जवळपास १७ कोटी अजून शिल्लक आहेत. तर देवस्थानांचे दोन कोटी आहेत.
हिंगोली जिल्ह्यात जलयुक्त कामांना यंदा प्राधान्याने मागणी होत आहे. गतवर्षी काही भागात झालेल्या कामांमुळे या योजनेकडे ग्रामस्थ सकारात्मक दृष्टिकोनातून पाहात आहेत. यात पाण्याचा शाश्वत स्त्रोत उपलब्ध होणार आहे. पावसाचे पाणी अडल्याने निदान रबी हंगामासाठी तरी त्याचा उपयोग करणे शक्य होत आहे. ज्या गावांत गतवर्षी संख्येने व दर्जाने चांगली कामे झाली, अशा गावांतील शेतकऱ्यांना यंदा दुष्काळी स्थितीतही रबीचे पीक घेता येत आहे.
गतवर्षी जलयुक्तसाठी २0.७९ कोटी मंजूर होते. त्यात जिल्हा नियोजनच्या विशेष निधीतील १0 टक्के याप्रमाणे ८ कोटी व पुन्हा ३.५ टक्के याप्रमाणे २.६५ कोटी रुपये मिळाले होते.
या निधीपैकी मूळ तरतुदीतील २0.७९ कोटींपैकीच १४ कोटी खर्च झाले. उर्वरित निधीला हातही लावला नाही. यात कृषी विभागाने ४.७५, वन विभागाने ४.२0, जलसंधारण विभागाने ५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तर लघुसिंचनने ८0 लाखांत गाळ काढला होता. उर्वरित निधी मात्र खर्च झाला नाही. काही विभागांची कामे मंजूर आहेत. मात्र ती प्रगतीत आहेत. त्यानंतरच त्यांचा खर्च ग्राह्य धरता येणार आहे. तरीही जवळपास दहा ते बारा कोटींच्या कामांचे नियोजन करावे लागणार आहे. शिवाय शिर्डी व सिद्धिविनायक संस्थानने दिलेल्या दोन कोटी रुपयांचाही खर्च करणे बाकी आहे. वेळेत नियोजन न केल्यास यंदाही पहिले पाढे पंचावन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.