आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी जायकवाडीतून सोडले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:04 IST2021-05-07T04:04:16+5:302021-05-07T04:04:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पैठण : तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे उघडून १०४८ क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा ...

आपेगाव, हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी जायकवाडीतून सोडले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी जायकवाडी धरणाचे दोन दरवाजे उघडून १०४८ क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सोडण्यात आला. गुुरूवारी सकाळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या हस्ते दरवाजे उघडण्यात आले. जायकवाडीतून १६.५६ दलघमी एकूण विसर्ग करण्यात येणार असल्याचे धरण अभियंता संदीप राठोड यांनी सांगितले. दोन्ही बंधाऱ्यांसाठी पाणी सोडल्याने आजूबाजूच्या ४० गावांना त्याचा फायदा होणार आहे.
जायकवाडी धरणातून बंधाऱ्यांसाठी पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. दरम्यान, राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना पत्र दिले होते. त्यानंतर आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांसाठी पाणी सोडण्याचा निर्णय शासन स्तरावर दोन दिवसांपूर्वी घेण्यात आला. गुरुवारी कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धरण अभियंता संदीप राठोड, जगताप यांनी पाणी सोडण्याबाबत तांत्रिक बाबींची पूर्तता करून धरणाचे १८ व १९ क्रमांकाचे दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून १०४८ क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात केला.
जायकवाडी धरणाच्या खाली असलेल्या चणकवाडी बंधाऱ्याच्या गेट क्रमांक ८ व ९चे एक लेअर काढून गोदावरीचे पाणी पुढे वाहते केले आहे. दरम्यान, पाणी बंद करण्याआधी चणकवाडी बंधारा पुन्हा भरून घेतला जाणार असल्याचे धरण अभियंता राठोड यांनी सांगितले. गोदावरी पात्रात आपेगाव व हिरडपुरी येथे उच्च पातळी बंधारे असून, दोन्ही बंधाऱ्यांची मिळून १६ दलघमीची साठवण क्षमता आहे. दरम्यान, या दोन्ही बंधाऱ्यांतील जलसाठा नगण्य झाल्याने गोदावरी काठावरील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती.
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
आपेगाव व हिरडपुरी बंधाऱ्यांच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या व गोदावरी पात्राच्या दोन्ही काठावरील पैठण, शेवगाव व गेवराई तालुक्यातील जवळपास ४० गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. या भागातील पिण्याचे पाणी, जनावरांच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे. आज पाणी सोडण्यात आल्याने या भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.