पाणीप्रश्न पेटतोय..!
By Admin | Updated: December 3, 2015 00:36 IST2015-12-03T00:29:34+5:302015-12-03T00:36:38+5:30
उस्मानाबाद : कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या परंडा तालुक्यात सीना-कोळेगाव प्रकल्प होवूनही टंचाईच्या झळा कमी झालेल्या नाहीत.

पाणीप्रश्न पेटतोय..!
उस्मानाबाद : कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या परंडा तालुक्यात सीना-कोळेगाव प्रकल्प होवूनही टंचाईच्या झळा कमी झालेल्या नाहीत. चांदणी प्रकल्पातील पाणीही बार्शीकर उद्योगासाठी घेऊन जातात. आता या पाण्यासाठी नव्या वाढीव जलवाहिनीचे काम सुरू केल्याने चांदणी परिसरासह परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. या योजनेला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय एकत्र आले आहेत. दुसरीकडे कळंब शहराच्या पाण्याचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. उजनीचे पाणी लातूरकर उस्मानाबादमार्गे नेणार असतील तर आम्ही काय पाप केले. कळंब तालुकाही तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसत आहे. त्यामुळे लातूरला पाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न झाल्यास या योजनेला कळंब पाणीपुरवठा योजना सलग्नीत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच विषयावर विशेष बैठक घेण्याची मागणीही पुढे आली आहे.
परंडा : चार वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थिती उद्भवत असल्याने चांदणी प्रकल्प वगळता अन्य तलावांमध्ये ठणठणाट आहे. शहरासह परंडा तालुक्यातील पन्नास गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवलेली आहे. अशातच चांदणी प्रकल्पातील जेमतेम पाणीसाठ्यावर बार्शीकरांची नजर पडल्याने तालुकावासियांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रश्नावर सर्वच पक्षीय एकवटल्याचे चित्र पहावयास मिळते.
तालुक्यातील मुख्य समजल्या जाणाऱ्या सीना कोळेगाव धरणात सध्या ठणठणाट आहे. खासापुरी प्रकल्पासह खंडेश्वरवाडी, निम्नखैरी, साकत हेही प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. सीनाकोळेगाव धरणामधील पाण्यावर परंडा तालुक्यातील २२ गावांचा पाणीपुरवठा असून करमळा तालुक्यातील १८ गावे विसंबून आहेत. खैरी नदीच्या आधारावर २० गावे खंडेश्वरवाडी, साकत प्रकल्पावर २३ गावे, खासापुरी प्रकल्पावर परंडा शहरासह अनेक गावे अवलंबून आहेत. हे सर्वच जलस्त्रोत कोरडे पडल्याने ५० गावांमध्ये ३५ विहिरी, ७५ बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तसेच कागांबाद, खासगाव, आसू, कुक्कडगाव, कडणेर, गोसावीवाडी या गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. परंडा शहरातही दहा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एकंदरीतच तालुक्यात सध्या भीषण टंचाई निर्माण झाली आहे.
दरम्यान, सध्या चांदणी प्रकल्पामध्ये केवळ २० टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पांतील पाणी जिल्हा प्रशासनाने आरक्षित केले आहे. हे पाणी बार्शीसह परंडा तालुक्यातील पिंपळवाडी, चांदणी, वाकडी, ब्रम्हगाव, क्षरणवाडीसह इतर गावांना पाणीपुरवठा होत आहे. मात्र, चांदणी प्रकल्पातून नवीन जलवाहिनीद्वारे पाणी बार्शी शहरातील उद्योग वसाहतीला देण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेचे काम झपाट्याने सुरू आहे. सदरील योजनेसंदर्भात परंडा तालुका अनभिज्ञ होता. मात्र, अचानकपणे या कामाचा उलगडा झाल्याने तालुकावासियांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या योजनेला विरोध करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच राजकीय पक्षांची मंडळी एकवटली असल्याने चांदणीचे पाणी पेटणार असल्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत. कुठल्याही परिस्थितीत चांदणीचे पाणी उचलू देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.‘
विशेष सभा बोलवा’कळंब : कळंब शहराच्या पाणीप्रश्नावरुन नगर परिषदेतील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा व्हावा, यासाठी खास सभा बोलवावी, अशी मागणी न.प.च्या ११ नगरसेवकांनी नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या नगरसेवकांचाही समावेश असल्याने न.प. तील पदाधिकाऱ्यांची कोंडी झाली आहे.
कळंब शहराला सध्या सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. हे पाणीही अपुरे असल्याने शहरवासियांची पाण्यासाठी चांगलीच धावाधाव होत आहे. शहराला मांजरा धरणातून जानेवारीअखेरपर्यंत पाणीपुरवठा होणार आहे. त्यानंतर चोराखळी व नांदगाव येथील तलावातून पाणी टँकरद्वारे आणण्याचे न.प. चे नियोजन आहे. हे पाणीही आगामी काळात पुरेसे ठरणार नाही. दरम्यान, उजनी धरणातून लातूरला पाणी नेण्याची चर्चा आहे. सदर योजना करणारच असाल तर कळंबची पाणीपुरवठा योजना या योजनेला संलग्नित करता येवू शकते. तालुक्यातील शिराढोण येथे प्रस्तावित उजनी पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी लातूरसाठी जोडण्यात येणार आहे. या जलवाहिनीस शिराढोण ते दाभा ही जलवाहिनी सोडल्यास कळंबला उजनीचे पाणी मिळू शकेल व शहराचा पाणीप्रश्न सुटू शकेल.
याबाबत न.प. ची विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी. तसेच याविषयी सर्वस्तरावर अशी मागणी नगरसेवक पांडूरंग कुंभार, श्रीधर भवर, कांतीलाल बागरेचा, गीता पुरी, किर्ती अंबुरे, छाया आष्टेकर, संजय मुंदडा, सलीम मिर्झा, आतीया शेख, काशीबाई खंडागळे, अजित करंजकर यांनी नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सभेसाठी बहुमत; सत्ताधारी कोंडीत
उजनी पाण्यासाठी विशेष सभा घ्या, या मागणीसाठी न.प. तील १७ पैकी ९ नगरसेवकांनी निवेदन दिले आहे. २ स्विकृत सदस्यांनीही निवेदनावर सभेसाठी स्वाक्षरी केली आहे. विशेष म्हणजे या निवेदनावर सत्ताधारी काँग्रेसच्या ३ नगरसेवकांची स्वाक्षरी आहे. या पाणीप्रश्नावर न.प. तील सत्ताधारी काँग्रेसचा सहकारी पक्ष शिवसेनेनेही विरोधीपक्ष राष्ट्रवादीशी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे न.प. मध्ये आता १७ पैकी ९ विरुद्ध ८ असे चित्र झाले आहे. राष्ट्रवादीच्या अनिता लोमटे यांची मात्र या निवेदनावर सही नाही. पाण्यासाठी ९ सदस्यांनी विशेष सभेची मागणी केल्याने सत्ताधारी मंडळी अल्पमतात गेल्याचे चित्र आहे.