अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

By Admin | Updated: July 3, 2016 00:29 IST2016-07-03T00:11:20+5:302016-07-03T00:29:58+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगर पालिकांची प्रभाग रचना निश्चित करून प्रशासनाच्या वतीने प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Water on the minds of many aspirants | अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी

अनेक इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी


उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठही नगर पालिकांची प्रभाग रचना निश्चित करून प्रशासनाच्या वतीने प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता पालिकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. लोकसंख्येनुसार नवीन वॉर्डरचना जाहीर झाल्यामुळे काही ठिकाणी वॉर्ड वाढले असले तरी बहुतांश ठिकाणी ही संख्या आहे तेवढीच राहिली आहे. दरम्यान, काही ठिकाणी मातब्बरांचे वॉर्ड आरक्षित झाल्यामुळे त्यांची मोठी कोंडी झाली असून, त्यांना आता इतर प्रभागातील वॉर्डांची शोधाशोध करावी लागणार आहे. दरम्यान, ५ ते १४ जुलै हा कालावधी हरकती व सूचना मागविण्यासाठी असून, प्राप्त हरकती व सूचनांवर २७ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी घेणार आहेत. त्यानंतर २ आॅगस्टपर्यंत हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून विभागीय आयुक्त तथा नगर परिषद प्रशासनाच्या प्रादेशिक संचालकांकडे जिल्हाधिकारी अहवाल पाठविणार असून, त्यानंतर विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत.
उस्मानाबाद : येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडतीची प्रक्रिया २ जुलै रोजी घेण्यात आली. नवीन वॉर्ड रचनेनुसार उस्मानाबादकरांना आता ३३ ऐवजी ३९ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. अनेक विद्यमान दिग्गज नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाल्याने त्यांना नवीन वॉर्डांचा शोध घ्यावा लागणार आहे. सदरील आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विद्यमान नगराध्यक्ष संपत डोके, मुख्याधिकारी मनोहरे आदींची उपस्थिती होती.
पालिकेच्या नाट्यगृहामध्ये सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत प्रक्रियेला सुरूवात झाली. आपला वॉर्ड कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित होतो? हे जाणून घेण्यासाठी आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबतच नागरिकांनीही सभागृहामध्ये गर्दी केली होती. सुरूवातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या सात जागांचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले. यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) ११ जागांसाठी सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग क्रमांक १९ मधील एक जागा नेमून देण्यात आली. त्यामुळे उर्वरित १० जागांसाठी चिठ्ठीद्वारे आरक्षण काढले. समांतर आरक्षणानंतर महिलांसाठी राखीव जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रभाग क्रमांक एकमध्ये दोन वॉर्डाचा समावेश आहे. यापैकी ‘अ’ अनुसूचित जाती तर ‘ब’ हा वॉर्ड सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. प्रभाग दोनमध्ये ‘अ’ ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी सुटली. तर ‘ब’ ही जागा खुल्या गटासाठी आहे. प्रभाग तीनमधील दोनही जागा आरक्षित आहेत. अ आणि ब अशा दोन्ही जागा अनुक्रमे नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी सुटल्या ओहत. प्रभाग चारामध्येही दोनच वॉर्ड आहेत. यापैकी ‘अ’ ही ओबीसी महिलेसाठी तर ‘ब’ ही जागा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सुटली आहे. प्रभाग पाच मधील ‘अ’ या जागेवर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला व ‘ब’ या जागेवर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना निवडणूक लढण्याची संधी आहे. प्रभाग सहामधील पहिली जागा (अ) ओबीसी महिलेसाठी तर दुसरी जागा (ब) खुल्या प्रवर्गासाठी आहे. प्रभाग सातमध्येही पहिल्या आणि दुसऱ्य जागेवर नामाप्र महिला व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळाली आहे. दरम्यान, प्रभाग आठमध्येही ‘अ’ ही जागा सर्वसाधारण महिला तर ‘ब’ ही जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. प्रभाग नऊमध्ये पहिल्या जागेवर (अ) ओबीसी प्रवर्गासाठी तर दुसरी जागा (ब) सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे.
प्रभाग दहामध्ये पहिली जागा नामाप्र महिलेसाठी तर दुसरी जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे. प्रभाग अकरामधील पहिली जागा अनुसूचित जाती तर दुसरी सर्वसाधारण महिलेसाठी आहे. प्रभाग बारामधील ‘अ’ या जागेचे आरक्षण ओबीसीसाठी आहे. तर दुसरीकडे ‘ब’ या जागेवर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेला संधी आहे. प्रभाग तेरामध्ये पहिली जागा नामाप्रसाठी तर दुसरी जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी आहे. प्रभाग चौदामध्ये सुरूवातीची जागा अनुसूचित जमाती तर दुसरी जागा सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखिव आहे. प्रभाग पंधरामधील ‘अ’ही जागा ‘ओबीसी’साठी तर ‘ब’ही जागा सर्वसाधारण महिलेसाठी आहे. प्रभाग सोळामधील अ आणि ब या दोन्ही जागा अनुक्रमे अनुसूचित जाती व सर्वसाधार प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहेत. प्रभागत सतरामधील पहिली जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी तर दुसरी जागा खुल्या प्रवर्गासाठी आहे.प्रभाग अठरामधील ‘अ’ ही जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आहे. तर ‘ब’ ही जागा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षित आहे.
प्रभाग १९ मध्ये तीन वॉर्ड आहेत. अ हा वॉर्ड अनुसूचित जाती महिलेसाठी, ब हा वॉर्ड ओबीसी महिलेसाठी तर क हा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी सुटला आहे. (प्रतिनिधी)
तुळजापूर : पालिकेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत न.प. सभागृहात शनिवारी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, नगराध्यक्षा अ‍ॅड. मंजुषा मगर, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, मुख्याधिकारी राजीव बुबणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यात तीन अनुसूचित जाती, पाच इमाव, पाच महिला याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रारंभी राजीव बुबणे यांनी प्रभाग संख्या, प्रभागाची रचना, प्रभागातील लोकसंख्या व त्यानुसार दिले जाणारे आरक्षण याची माहिती दिली. यापूर्वी गटनेते नारायण गवळी हे वासुदेव गल्ली, वडार गल्लीतून निवडून आले होते. येथे दोन्ही जागा आरक्षित झाल्याने गवळी यांना नवीन वॉर्ड शोधावा लागणार आहे, तर प्रभाग ६ मध्ये स्वीकृत सदस्य औदुंबर कदम हे इच्छुक होते. परंतु या ठिकाणी महिला एस.सी. आरक्षण झाल्याने त्यांचीही पंचायत झाली आहे. उर्वरित ठिकाणी विनोद गंगणे, सज्जनराव साळुंके, पंडितराव जगदाळे, बाळासाहेब शिंदे, नगराध्यक्षा मंजुषा मगर, बाळासाहेब डोंगरे, नागनाथ भांजी, काँग्रेसचे सचिन पाटील, अमर मगर, अमोल कुतवळ, ऋषिकेश मगर, सुनील रोचकरी, देवानंद रोचकरी, अविनाश गंगणे, शहाजी भांजी, रणजित इंगळ, भारत कदम, सुहास साळुंके, विशाल कोंडो, बापू कणे, विशाल रोचकरी, विकास मलबा या सर्वसाधारण खुल्या गटातून त्यांची लढत पाहण्यास मिळणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Water on the minds of many aspirants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.