जायकवाडीचा पाणीसाठा ४३ टक्के

By Admin | Updated: September 12, 2014 00:29 IST2014-09-12T00:12:43+5:302014-09-12T00:29:50+5:30

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने धरणात आवक सुरू असून पाणीपातळी ४२.२८ टक्के झाली आहे.

The water level of Jaikwadi is 43% | जायकवाडीचा पाणीसाठा ४३ टक्के

जायकवाडीचा पाणीसाठा ४३ टक्के

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने धरणात आवक सुरू असून पाणीपातळी ४२.२८ टक्के झाली आहे. विसर्ग गुरुवारी घटविण्यात आल्याने धरणातील आवक कमी होत आहे. धरणात ११०५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस उघडला असल्याने तेथील धरणातून गुरुवारी विसर्ग मोठ्या प्रमाणात घटविण्यात आला. नांदूर मधमेश्वर मधून १४,४४४, गंगापूर २,०८८, ओझर वेअर ३,३४६, निळवंडे ३,५४९, भंडारदरा २,०३०, दारणा ५,४२३, मुळा १,५०० क्युसेक्स विसर्ग करण्यात येत आहे.
नागमठाण येथील सरिता मापन केंद्रावर गोदावरी १६,४०० क्युसेक्स क्षमतेने वाहत आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता धरणाची पाणीपातळी १५०९.५० फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा १६५६.१६५ दलघमी झाला असून यापैकी ९१८.०५९ दलघमी उपयुक्त (जिवंत) जलसाठा आहे.
जायकवाडीवरील धरणातील
जलसाठा
मुळा- ९३.३० टक्के, भंडारदरा- १०० टक्के, दारणा- ९५.२४ टक्के, गंगापूर- ९२.४६ टक्के, करंजवन- ९२.०५ टक्के, नांदूर मधमेश्वर ७२.७६ टक्के, ओझरखेड- ५६.९३ टक्के, पालखेड- १०० टक्के, निळवंडे- १०० टक्के.
२०१२ ला जायकवाडीची मोठी बिकट अवस्था झाली होती. यावर्षी धरणात २० नोव्हेंबरला ३.२० टक्के जलसाठा झाला होता. यानंतर मुळा धरणातून सोडलेले पाणी २९ नोव्हेंबर २०१२ ला जायकवाडीत दाखल झाले.
या पाण्यामुळे १४ डिसेंबर रोजी जलसाठा ९.३३ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता, अशी माहिती धरण नियंत्रण कक्षातून आर. ई.चक्रे यांनी दिली. (वार्ताहर)
अहमदनगर जिल्ह्यातील धरणे १०० टक्के भरलेली असताना जायकवाडीसाठी ओझर वेअरमधून पाणी सोडणे गरजेचे होते, मात्र असे न होता चक्क मुळा व ओझर वेअरचे कालवे मोकळे सोडून पाणी वळविण्यात आले. यंदा हे पाणी आले असते तर जायकवाडी आत्ताच ६२ टक्के भरले असते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
१० प्रकल्प अजूनही कोरडे,
४२ चा साठा जोत्याखाली
औरंगाबाद : पावसाळा संपत आला असला आणि जायकवाडी धरणातील साठ्यात वाढ झाली असली तरी जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थिती अतिशय वाईट आहे. जिल्ह्यातील १० लघु प्रकल्प पूर्णपणे अजूनही कोरडेच आहेत. तर ४२ प्रकल्पांमधील साठा जोत्याखाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९० लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकत्रित साठवण क्षमता ४४३ द. ल. घ. मी. आहे; परंतु सध्या या प्रकल्पांमध्ये ११० द. ल. घ. मी. इतका साठा आहे.
मागील पंधरा दिवसांत पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली; पण तरीही जून, जुलै आणि आॅगस्ट या तीन महिन्यांत पुरेसा पाऊस न पडल्याने बहुसंख्य प्रकल्प रिकामेच होते. त्यामुळे आजही जिल्ह्यातील प्रकल्प भरलेले नाहीत. जिल्ह्यातील १० लघु प्रकल्पांमध्ये अजून थोडेही पाणी साचलेले नाही. तर ४२ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखालीच आहे. यात ६ मध्यम आणि ३६ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.
जिल्ह्यात सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यांतील प्रकल्पांची परिस्थिती चांगली आहे. या दोन तालुक्यांत एकही प्रकल्प कोरडा नाही. औरंगाबाद, कन्नड, गंगापूर, फुलंब्री आणि पैठण तालुक्यांतील प्रकल्पांमध्ये मात्र जेमतेम साठा आहे. प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा विचार करता १५ प्रकल्प ७६ ते १०० टक्क्यांदरम्यान भरले आहेत. तर ५१ ते ७५ टक्के यादरम्यान साठा असलेल्या प्रकल्पांची संख्या केवळ ५ इतकी आहे.
१४ प्रकल्पांमध्ये २६ ते ५० टक्क्यांदरम्यान साठा आहे. तर २० प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे.

Web Title: The water level of Jaikwadi is 43%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.