पाणीपातळी वाढू लागली

By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T01:31:32+5:302014-08-02T01:43:59+5:30

पैठण : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी दि. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून जायकवाडी धरणात दाखल झाले.

Water level began to grow | पाणीपातळी वाढू लागली

पाणीपातळी वाढू लागली

पैठण : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी दि. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून जायकवाडी धरणात दाखल झाले. आज दुपारी ४ वाजेपर्यंत धरणाच्या पाणी पातळीत दीड फुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात १४,७७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे.
नाशिक व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर कमी झाल्याने जायकवाडीत येणाऱ्या पाण्यात घट होण्याची शक्यता धरण नियंत्रण कक्षातील कनिष्ठ अभियंता अशोक नरुटे यांनी व्यक्त केली आहे. जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
जायकवाडी धरणाचे बंदिस्त पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे प्रचलन आराखड्यानुसार निश्चित केलेल्या टक्केवारीपेक्षा जास्त भरली आहेत. आजच्या तारखेला धरणात किती पाणीसाठा करता येतो, हे प्रचलन आराखड्यानुसार गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांना ठरवून दिले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून ८६४९ क्युसेक्स, गंगापूर धरणातून १०४१ क्युसेक्स असा विसर्ग करण्यात येत असून, हा एकत्रित विसर्ग नांदूर-मधमेश्वर वेअरमधून ९६८४ क्युसेक्स गोदावरी पात्रात होत आहे.
नांदूर-मधमेश्वर वेअरमधून सुटलेले पाणी १५४ कि.मी. प्रवास करीत २६ तासांनंतर जायकवाडीत दाखल झाले. सुरुवातीला या पाण्याची आवक अत्यंत कमी होती; मात्र रात्री ११ वाजेनंतर वाढ होत गेल्याने ४४,००० क्युसेक्स क्षमतेने रात्री १ वाजेनंतर धरणात आवक होत होती. गेल्या २४ तासांत जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक- ३० मि.मी., गंगापूर- ५० मि.मी., भंडारदरा- ३४ मि.मी. निळवंडे- ३७ मि.मी. व कोतुळ- ३४ मि.मी. एवढीच पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक घटण्याची शक्यता धरण नियंत्रण कक्षातील आर.ई. चक्रे यांनी व्यक्त केली आहे.
१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी दि. ३१ जुलै रोजी १४९५.१८ फूट एवढी होती. ती शुक्रवार, दि. १ आॅगस्ट रोजी दुपारी १४९६.६२ फुटापर्यंत वाढली आहे. जवळपास धरणाच्या पाणी पातळीत दीड फुटाने वाढ झाली असून, दि. ३१ जुलै रोजी धरणातील जलसाठा १.४४ टक्के एवढा होता. तो ४.७७ टक्के एवढा झाला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी १४९६.६२ फूट व ४५६.१७० मीटरमध्ये आहे. धरणात पाणी दाखल झाल्याने एकूण जलसाठा ८४१.६७४ द.ल.घ.मी. जिवंत साठा झाला आहे. (वार्ताहर)
जिवंत साठ्यात वाढ
दि. ३१ जुलै रोजी धरणात ३१.३७८ द.ल.घ.मी. म्हणजे १.१० टी.एम.सी. (१ टी.एम.सी. दशांश दहा) एवढा जलसाठा होता. हा उपयुक्त जलसाठा आज रोजी १०३.६७४ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. म्हणजेच धरणात ३.६३ टी.एम.सी. जलसाठा झाला असून, उपयुक्त जलसाठ्यात २.५३ टी.एम.सी.ने वाढ झाली आहे. वाढलेल्या उपयुक्त जलसाठ्यामुळे धरणातून पिण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या सर्व योजनांना दिलासा मिळाला आहे.
प्रचलन आराखडा डावलून केला जलसाठा
प्रचलन आराखड्यानुसार जायकवाडी धरणात १ आॅगस्ट रोजी ८८.७८ टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा करता येत नाही. यापेक्षा जास्त जलसाठा झाल्यास धरणातून विसर्ग करावा लागतो. राज्य शासनाने ठरवून दिलेला प्रचलन आराखडा डावलून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणात १ आॅगस्ट २०१४ रोजी जास्तीचा जलसाठा करण्यात आला आहे. वरील धरणात साठविण्यात आलेले पाणी हे जायकवाडीच्या हक्काचे आहे. त्यामुळे बेकायदेशीररीत्या अडविलेले पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
जायकवाडीवरील धरणातील जलसाठा
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरील धरणात आज रोजी पुढीलप्रमाणे जलसाठा झाला आहे. यात करंजवन धरण- ४३.५० टक्के, गंगापूर धरण ८०.१७ टक्के, दारणा धरण- ७६.७८ टक्के, भंडारदरा धरण- ६१.४१ टक्के, ओझरखेड १९.४१ टक्के, पालखेड धरण- ९४.७१ टक्के व मुळा धरण- ३४.८१ टक्के.

Web Title: Water level began to grow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.