मराठवाड्यात वॉटर ग्रीड योजना प्रभावीपणे राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST2020-12-17T04:25:57+5:302020-12-17T04:25:57+5:30
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत १३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ही योजना ...

मराठवाड्यात वॉटर ग्रीड योजना प्रभावीपणे राबविणार
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनअंतर्गत १३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात येईल. राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार असल्याचे मत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे व्यक्त केले.
गरवारे क्रीडा संकुलावर आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, औरंगाबादेत राज्यातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. कोविडनंतर ही पहिली बोहणी आहे. यापुढे राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतील. १३ हजार कोटींच्या वॉटर ग्रीड योजनेत केंद्र शासनाचा ५० टक्के आणि राज्याचा ५० टक्के वाटा आहे. वॉटर ग्रीडमध्ये पैठणसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. भविष्यात मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.
समृद्धी योजनेमुळे लाखोंना रोजगार
समृद्धी योजनेमुळे राज्यातील १० जिल्ह्यांना प्रत्यक्ष तर १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्ष फायदा होत आहे. लाखो तरुणांना रोजगार मिळणार आहे, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मुंबई, कल्याण आणि ठाण्यानंतर औरंगाबादेत होत आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी ही आनंद देणारी बाब आहे. सफारी पार्कमध्ये दरवर्षी १० लाख पर्यटक भेट देतील.
औरंगाबादेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारसा जपण्याचे काम करीत आहेत. शहरातील नागरिकांना त्रास झाला तर दुःख मुख्यमंत्र्यांना होते. शहरात कचराप्रश्न निर्माण झाला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तो कायमस्वरूपी सोडवून घेतला. शहरातील कचरा प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण करण्यासाठी लवकरच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. मेल्ट्रॉन येथील कोविड हॉस्पिटल नंतर संसर्गजन्य आजारांसाठी चालविण्यात येईल. डीएमआयसी आणि आँरिक सिटीमध्ये गुंतवणूक होणार आहे. टीसीएस कंपनीने पाहणीसुद्धा केली आहे. बिडकीन फूड पार्कचे काम येत्या दोन महिन्यांत सुरू होईल.