पाणीयोजनांचे ग्रहण सुटणार !
By Admin | Updated: October 31, 2016 00:03 IST2016-10-31T00:01:31+5:302016-10-31T00:03:50+5:30
वेगवेगळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता कात टाकणार आहेत.

पाणीयोजनांचे ग्रहण सुटणार !
बीड : कुठे पाईप लाईनला गळती... कोठे विद्युत पंप चोरीला गेलेले... काही ठिकाणी तांत्रिक बिघाड... अशा वेगवेगळ्या समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आता कात टाकणार आहेत. राज्याच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी योजनांच्या दुरुस्तीला हिरवा कंदील दाखविला असून जिल्हा परिषदेमार्फत १८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक बनविणे सुरु आहे. जिल्ह्यात पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना असून, त्यापैकी काही २५-३० वर्षांपूर्वीच्या आहेत. या योजनांना गेल्या काही वर्षांपासून समस्यांचे ग्रहण लागले. त्यामुळे योजनेवर विसंबून असलेल्या गावांनाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुश्की ओढवली होती. या योजनांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जि.प. मार्फत शासनाकडे पाठविला होता. दरम्यान, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मुख्यमंत्री पेयजल योजना राबवितानाच जुन्या प्रादेशिक योजनांना गतवैभव प्राप्त करून देण्याचे धोरण ठरविले होते. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या आसरडोह (ता. धारूर), पट्टी वडगाव नऊ गावे (ता. अंबाजोगाई) केज-धारूर बारा गावे, पूस वीसखेडी या योजनांच्या दुरुस्तीची कामे होणार आहेत. सोबतच अंबाजोगाई तालुक्यातील संगम १८ खेडी या योजनेचेही पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. या सर्व योजनांसाठी १७ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)