जमीन विकून पाजले गावाला पाणी

By Admin | Updated: September 6, 2015 23:59 IST2015-09-06T23:32:11+5:302015-09-06T23:59:39+5:30

बीड : गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे स्वत:ची दोन एकर जमीन विकून विहीर खोदली. एवढेच नाही तर तीन किमी अंतरावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणून कायमस्वरुपी प्रश्न सोडविला.

Water by drinking water | जमीन विकून पाजले गावाला पाणी

जमीन विकून पाजले गावाला पाणी


बीड : गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे स्वत:ची दोन एकर जमीन विकून विहीर खोदली. एवढेच नाही तर तीन किमी अंतरावरुन पाईपलाईनद्वारे पाणी आणून कायमस्वरुपी प्रश्न सोडविला. अशा प्रकारे दुष्काळात सामाजिक बांधिलकीचा ओलावा जपण्याचे काम काळेगाव हवेली (ता. बीड) येथे राजेंद्र पवार या सामाजिक कार्यकर्त्याने केले आहे. चारा छावण्या, पाणीपुरवठ्याच्या ठेक्यासाठी मारामार करणाऱ्यांच्या डोळ्यात काळेगावच्या पवारांनी झणझणीत अंजन घातले आहे.
जलस्वराज्य, स्वजलधारा, भारत निर्माण या एक ना अनेक योजना राबवूनही कित्येक गावे तहानलेलीच आहेत. योजनेसाठी आलेला निधी घशात घालून गावांना वेठीस धरण्याचे प्रकार जागोजागी होत असताना काळेगावात राजेंद्र पवार यांनी पदरमोड करुन गावाला दिलासा दिला. या विहिरीवरील पाण्यावरच सध्या अख्ख्या गावची तहान भागवली जात आहे. ३ हजार लोकसंख्येच्या काळेगावमध्ये पाण्याचे मोठे दुर्भिष्य. डोईवर हंडा व रानोमाळ पायपीट हा इथल्या बायाबापड्यांचा ठरलेला नित्यक्रम! गावाच्या हिताची तळमळ असलेल्या राजेंद्र पवार यांनी पाणीप्रश्न दूर करण्यासाठी पाऊल उचलले. त्यांनी ना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजविले ना कोणापुढे हात पसरवले. त्यांचा स्वत:चा विहीर खोदण्याचा व्यवसाय आहे. क्रेन घरचेच असल्याने उरला प्रश्न इतर खर्चाचा. पैसा अपुरा पडू नये यासाठी त्यांनी दोन एकर जमीन विकून त्याचीही तरतूद केली. गावालगतच्या बुडीत क्षेत्रात ‘स्पॉट’ निश्चित करुन खोदकामाचा नारळ फोडला. योगायोगाने पाणीही भरपूर लागले. त्यामुळे पवारांचा उत्साह वाढला. त्यांनी तीन एकरवरुन पाईपलाईनद्वारे गावात पाणी आणले.
पाण्याच्या टाक्या बसवून वाटपाचे योग्य नियोजन केले. त्यामुळे आवश्यक तेवढ्याच पाण्याचा उपसा होतो. दुष्काळाचा फायदा घेऊन पाण्याचा पैसा करणाऱ्यांच्या गर्दीत राजेंद्र पवार यांनी मात्र माणुसकीचे दर्शन घडविले आहे. याकामी गणेश पवार, संभाजी साबळे यांचे सहकार्य मिळाल्याचे राजेंद्र पवार यांनी सांगितले.
विहीर, पाईपलाईनसाठी १३ लाख रुपये खर्च आला. गावाला पाणीपुरविण्याचा संकल्प आपण केला होता, शब्दाला जागायचे होते. त्यामुळेच जमीन विकण्याचे धाडस केले. मला राजकारण करायचे नाही, अशी प्रतिक्रिया राजेंद्र पवार यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Water by drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.