पाणी मुबलक, पण क्षमता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:58 IST2016-03-26T23:58:31+5:302016-03-26T23:58:31+5:30

औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहागंज पाण्याच्या टाकीवर जवळपास ४० वॉर्डांमधील पाच लाख नागरिकांची तहान अवलंबून आहे

Water does not have abundant, but the ability | पाणी मुबलक, पण क्षमता नाही

पाणी मुबलक, पण क्षमता नाही


औरंगाबाद : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शहागंज पाण्याच्या टाकीवर जवळपास ४० वॉर्डांमधील पाच लाख नागरिकांची तहान अवलंबून आहे. टाकीत साठवण क्षमताच नसल्याने जायकवाडीहून येणारे पाणी जवळपास २० तास बंद ठेवावे लागते. ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी या टाकीवर नगरसेवकांमध्ये रणकंदन सुरू होते. एप्रिल आणि मे महिन्यात नगरसेवक अक्षरश: टाकीतील पाण्यावर दरोडा टाकतात. मात्र, या गंभीर प्रकाराकडे सिटी वॉटर युटिलिटी कंपनी दुर्लक्ष करीत आहे.
शहागंज येथील पाण्याची टाकी १९७२ मध्ये बांधण्यात आली. ४४ वर्षांपूर्वी शहराची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून टाकीचे डिझाईन तयार करण्यात आले. अगोदर हर्सूल तलावातील पाणी टाकीत नियमित येत असे. हे पाणी कमी पडू लागल्याने नंतर जायकवाडीहून ७०० मि. मी. व्यासाच्या पाईपद्वारे पाणी टाकीत आणण्यात आले. टाकीच्या खाली फक्त २ लाख ७५ हजार लिटर साठवण क्षमतेचा हौद बांधण्यात आला. तब्बल ३० फूट उंचीवर २३ लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यात आली. लोकसंख्या वाढू लागल्याने नंतर १४०० मि. मी. व्यासाची लाईनही आणण्यात आली.
जायकवाडीहून येणाऱ्या ७०० मि. मी. व्यासाच्या लाईनचेच पाणी हौदात सोडण्यात येते. १४०० मि. मी. व्यासाची लाईन किमान २० तास बंद ठेवावी लागते. टाकीच्या खाली साठवण क्षमता अत्यंत कमी आहे. दोन पंपाद्वारे २४ तास पाणी टाकीवर चढविण्यात येते. अडीच तासात टाकी भरते आणि एक तासात रिकामी होते. टाकीच्या बाजूला किमान २० लाख लिटर क्षमतेचा हौद बांधवा ही मागणी मागील दोन दशकांपासून करण्यात येत आहे. याकडे मनपाने कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. मागील दीड वर्षापासून शहराच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या कंपनीलाही याच्याशी काहीच देणे-घेणे नाही.
सध्या २५ वॉर्डांना थेट पाणी
शहागंज पाण्याच्या टाकीवरून जुन्या शहरातील २५ वॉर्डांना थेट पाणीपुरवठा करण्यात येतो. आपल्याच वॉर्डातील नागरिकांना जास्तीत जास्त पाणी मिळावे म्हणून नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते टाकीवर तळ ठोकून असतात. टाकी भरल्यावर आपल्याच वॉर्डाचा ‘टप्पा’(पाणीपुरवठा) सुरू करावा, असा आग्रह नगरसेवकांचा असतो.
दिल्लीगेटलाही पाणी
हर्सूल तलाव आटल्याने दिल्लीगेट येथील पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या १३ पेक्षा अधिक वॉर्डांना शहागंजहून पाणी द्यावे लागते.
हत्तेसिंगपुरा येथेही अनेक वर्षांपासून पाण्याची टाकी बांधून ठेवण्यात आली होती. आता या टाकीवरूनही लवकरच पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: Water does not have abundant, but the ability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.