पाण्यासाठी देवर्जन-देवणीकरांत तंटा !
By Admin | Updated: May 31, 2014 00:56 IST2014-05-31T00:48:32+5:302014-05-31T00:56:26+5:30
व्ही़एस़ कुलकर्णी, उदगीर उदगीर तालुक्यातील देवर्जन परिसरातील शेतकर्यांच्या हितासाठी बांधण्यात आलेल्या देवर्जन मध्यम प्रकल्पातील पाणी

पाण्यासाठी देवर्जन-देवणीकरांत तंटा !
व्ही़एस़ कुलकर्णी, उदगीर उदगीर तालुक्यातील देवर्जन परिसरातील शेतकर्यांच्या हितासाठी बांधण्यात आलेल्या देवर्जन मध्यम प्रकल्पातील पाणी देवणीसाठी न देता आमच्या हक्काचे पाणी आमच्यासाठीच राहू द्या, असा टाहो देवर्जनवासीयांनी फोडला आहे. त्यासाठी येत्या २ जूनपासून तीव्र आंदोेलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील परिसरातील शेतकर्यांच्या जीवनात क्रांती घडावी, यासाठी तब्बल ३२ कि.मी. कॅनॉल खोदून देवर्जन मध्यम प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. आपली शेती पाण्याची होणार असल्यामुळे त्यातून चांगले उत्पादन मिळेल, या आशेपोटी शेतकर्यांनी आपल्या जमिनी या प्रकल्पासाठी अल्प किंमतीत दिल्या. असे असताना या प्रकल्पाचे पाणी ३२ कि.मी. पर्यंत एकदाही गेलेले नाही. २० वर्षांत हा प्रकल्प फक्त तीनच वेळा तुडूंब भरून वाहिला आहे. शिवाय, सात कि.मी. पुढे या प्रकल्पाचे पाणी एकदाही पुढे गेलेले नाही. मागच्या वर्षी या प्रकल्पात केवळ १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना सिंचन विभागाने या प्रकल्पात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र दिल्यामुळे उदगीर पालिकेने या प्रकल्पातील १.३४ द.ल.घ.मी. पाणी आरक्षित करून शहरासाठी ४ कोटी रुपयांची तात्पुरती पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. जुलै २०१३ पर्यंत एक वर्षासाठी ही तात्पुरती पाणीपुरवठा योजना असताना मे २०१४ पर्यंत ही पाणीपुरवठा योजना उदगीरसाठी सुरूच आहे. अगोदरच या प्रकल्पातून ८ गावांसाठी व उदगीर शहरासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. असे असताना प्रशासनाने या प्रकल्पातील पाणी देवणी शहराला देण्याची तयारी चालविली आहे़ आमच्या प्रकल्पातील हक्काचे पाणी आम्हालाच मिळाले पाहिजे. नियोजित देवणीची योजना या प्रकल्पातून राबविली जाऊ नये, अशी आग्रही भूमिका देवर्जनवासीयांनी घेतली आहे. या प्रकल्पातील पाणी देवणीसाठी दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बस्वराज रोडगे, लक्ष्मण बतले, धनराज केळगावे, नारायण मिरगे यांच्यासह देवर्जनच्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
रमेश कोतवाल, देवणी देवर्जन प्रकल्पाच्या कॅनॉलसाठी देवणी परिसरातील अनेक शेतकर्यांनी शेकडो एकर जमीन पणाला लावली़ सिंचनाची सोय होईल, या हेतूने शेतकर्यांनी विनाअट जमिनी सोडल्या़ परंतु, आजतागायत या प्रकल्पातून थेंबही पाणी या भागातील शेतकर्यांपर्यंत पोहोचले नाही़ प्रकल्पातील पाण्यावर केवळ देवर्जन परिसरातील शेतकर्यांचेच सिंचन झाले़ याबद्दल चकार शब्दही या भागातील शेतकर्यांनी कधी काढला नाही़ मात्र आता १ दलघमीपेक्षा कमी क्षमतेची पाणीपुरवठा योजना देवर्जन प्रकल्पातील देवणीसाठी होत असताना, त्यास हकनाक विरोध केला जात असल्याची भावना देवणीकरांमध्ये निर्माण झाली आहे़ या योजनेसाठी आता देवणीकरही पुढे आले असून, त्यांनीही सर्वपक्षीय आंदोलनाची तयारी चालविली आहे़ देवणी शहरासाठी सध्या एकमेव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे़ मात्र ती केवळ तलावातील विहिरीवर अवलंबून असल्याने शहरात पाणीटंचाई वाढली आहे़ त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने देवर्जन प्रकल्पातून योजना राबविण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठविला होता़ १३ कोटी रुपये खर्चाच्या योजनेस राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून मंजुरी मिळाली आहे़ मात्र केवळ ०.४८ द.ल.घ.मी. इतक्याच पाणी उपशास परवानगी देण्यात आली आहे. देवर्जन प्रकल्प साकारताना देवणीसह गुरधाळ, पंढरपूर, नेकनाळ, विळेगाव, हंचनाळ, बोरोळ, देवणी (खु.), संगम, पेठेवाडी भागातील शेतकर्यांनी कॅनॉलसाठी शेकडो एकर जमिनी सोडल्या. मात्र आजतागायत या शेतकर्यांना प्रकल्पातील थेंबही पाणी मिळाले नाही. मात्र याबाबत शेतकर्यांनी कधीही तक्रारी केल्या नाहीत. आता इतक्या वर्षानंतर किमान पिण्यासाठी तरी पाणी मिळेल, अशी आशा देवणीकरांमध्ये निर्माण झाली आहे. देवणी शहरासाठी नजिकच्या क्षेत्रात पाणीपुरवठा योजना राबविण्याइतपत एकही सक्षम प्रकल्प नाही. त्यामुळे जवळच्या देवर्जन प्रकल्पाचा विचार केला गेला. मात्र आता देवर्जनकरांनी या योजनेला विरोध दर्शविल्याने देवणीकरही पुढे आले आहेत. त्यांनीही आंदोलनाची तयारी चालविली आहे.आमच्या हक्काचे देवर्जन मध्यम प्रकल्पातील पाणी आम्हालाच द्या. देवणी शहराला या प्रकल्पातील पाणी दिल्यास २ जून २०१४ पासून उदगीरच्या उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा मिळावा व शेतकर्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करणारे बॅनर देवर्जन परिसरात झळकू लागले आहेत. देवर्जन प्रकल्पासाठी येथील शेतकर्यांनी कवडीमोल भावात शेकडो एकर जमीन दिली. तुलनेने त्याचा पुरेसा लाभ कधीही मिळाला नाही. आता उदगीर पाठोपाठ देवणीकरांचाही आमच्या हक्काच्या पाण्यावर डोळा असल्याची भावना देवर्जनकरांमध्ये निर्माण झाली आहे.देवर्जन मध्यम प्रकल्पातून केवळ उदगीर व देवणी शहरांच्या योजनांनाच पाणी उपशाची परवानगी आहे. उदगीरसाठी तब्बल १.३४ द.ल.घ.मी. पाणी उपसा केला जातो. तुलनेने देवणीसाठी केवळ ०.४८ द.ल.घ.मी. पाणी उपशाची परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही देवर्जनकरांचा उदगीरसाठी विरोध अत्यंत मवाळ राहिला. मात्र आता देवणीसाठी देवर्जनकर जोरदार विरोध करीत आहेत. हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल करीत आपणही रस्त्यावर उतरू, असा इशारा देवणीचे सरपंच देविदास पतंगे, उपसरपंच बाबूराव इंगोले, चेअरमन माधवराव धनुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, भाजप तालुकाध्यक्ष वैजनाथ अष्टुरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष माणिकराव लांडगे व ग्रामस्थांनी दिला आहे. ऐन उन्हाळ्यात उदगीर तालुक्यातील देवर्जन मध्यम प्रकल्पाच्या पाण्यावरून भडका उडाला आहे. या प्रकल्पातून देवणी शहरासाठी नव्याने पाणीपुरवठा योजना शासनाने मंजूर केली आहे. त्यासाठी तब्बल १३ कोटी रुपये खर्चास मंजुरीही देण्यात आली आहे. मात्र देवर्जन प्रकल्पातील पाण्यावर आपलाच हक्क असल्याचा दावा करीत देवर्जनकरांनी देवणीच्या पाणीपुरवठा योजनेस विरोध सुरू केला आहे. योजना कार्यान्वित होऊ नये, यासाठी या भागातील ग्रामस्थांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, ठिकठिकाणी बॅनर्स लावून जनजागृती करीत पाणीप्रश्न पेटविला जात आहे. २ जूनपासून आंदोलन उभारण्याची तयारी देवर्जनकरांकडून केली जात असतानाच आता देवणीकरही पाणीपुरवठा योजनेच्या समर्थनार्थ रिंगणात उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत योजना झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी करीत प्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा मानस सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी व्यक्त केला आहे.