जायकवाडीतील पाण्याची नासाडी
By Admin | Updated: January 23, 2017 23:42 IST2017-01-23T23:38:21+5:302017-01-23T23:42:40+5:30
तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे वभिागाअंतर्गत असलेल्या पैठण डाव्या कालव्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

जायकवाडीतील पाण्याची नासाडी
तीर्थपुरी : जायकवाडी पाटबंधारे वभिागाअंतर्गत असलेल्या पैठण डाव्या कालव्यामधून सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, ही नासाडी थांबविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाहीची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
उत्तर पैठण जायकवाडी पाटबंधारे विभागाअंतर्गत येणाऱ्या या डाव्या कालव्यामधून २८ नोव्हेंबर २०१६ पासून रबी हंगामातील पिकांसाठी पाणी सोडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, कापूस, मका आदी पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून हे पाणी सोडण्यात असून, आतापर्यंत घनसावंगी तालुक्यातील कॅनॉल अंतर्गत वितरिकांची पाणीपाळी संपून गेली आहे. परंतु, पाणीपाळी संपलेल्या या वितरिका कागदोपत्री बंद दाखविण्यात येत असल्या तरी प्रत्यक्षात त्या अद्यापही सुरूच आहेत. त्यामुळे हे पाणी उपवितरिकांमार्फत नद्या, नाले व ओढ्यांना जात असल्याचे चित्र आहे.
जायकवाडीचे अनेक शाखा अभियंता हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे शेतकरीही लागेल त्या वेळी पाणी घेत असून, यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. ही नासाडी अशीच सुरू राहिल्यास नाथसागरातील पाणीपातळी झपाट्याने कमी होवू शकते. त्यामुळे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून तातडीने पाण्याची होत असलेली नासाडी थांबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)