वाळूजमध्ये उद्योगासह निवासी क्षेत्राचे पाणी कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:08 IST2019-04-16T23:08:31+5:302019-04-16T23:08:40+5:30
संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता उद्योग व निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचा निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे.

वाळूजमध्ये उद्योगासह निवासी क्षेत्राचे पाणी कपात
वाळूज महानगर : संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता उद्योग व निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचा निर्णय एमआयडीसी प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे वाळूज उद्योगनगरीतील उद्योगांना फटका बसणार असून, उत्पादनावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
एमआयडीसीकडून वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, जालना औद्योगिक वसाहतीला तसेच वाळूज महानगरातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जायकवाडी जलाशयात पुरेसा जलसाठा होऊ शकला नाही. दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. एमआयडीसीच्या वाळूज भागतील जलकुंभारवरुन शेकडो गावांना टँकरने पाणी दिले जात आहे. सध्या धरणातील मृत साठ्यातून उद्योगासह निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात आहे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एमआयडीसीने धरणातील उपलब्ध साठ्याचे नियोजन करुन उद्योगासह निवासी क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची वेळ कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार वाळूज महानगरातील निवासी क्षेत्राला पहाटे ५ ते दुपारी १ व वाळूज औद्योगिक क्षेत्राला दुपारी १ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत पाणीपुरवठा केला जाणार आहे. याचप्रमाणे चिकलठाणा औद्योगिक क्षेत्राला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत फक्त ३ तास, शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार ३ तास, औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत तर औरंगाबाद नागरी वसाहतीला सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच जालना औद्योगिक क्षेत्राला पाणी उपलब्धतेनुसार दररोज ३ तास पाणी दिले जाणार आहे.