७० गावांवर पाणी संकट घोंगावतय
By Admin | Updated: August 9, 2014 00:33 IST2014-08-08T23:14:47+5:302014-08-09T00:33:10+5:30
बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे.

७० गावांवर पाणी संकट घोंगावतय
बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे. आज स्थितीतही बीड तालुक्यात ७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. या सर्व ठिकाणी प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील पावसाचा पत्ता नाही. हुलकावणी दिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तर डोळ्यातच पाणी आले आहे. अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैलची पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात ७७ हजार ७२० नागरिकांना सध्या जिल्हा प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. यामध्ये ५३ गावांची तर १७ वाड्यांची संख्या आहे. तालुक्यात एकूण शासकीय टँकर चार आहेत. तर खाजगी ४३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीटंचाईचे हे संकट ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याचेही पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी तर स्थानिक राजकारणांमुळे योजना रखडलेल्या आहेत.
३० विहिरींचे अधिग्रहण
पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होत असल्याने प्रशासनाने तालुक्यात ३० विहिरी व ३५ बोअर अधिग्रहित केले आहेत. यामुळे काही गावांचा पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटला आहे. मात्र पाण्याचे उद्भव आटत चालले असल्याचे बीड तालुक्यातील चौसाळा परिसरात पहावयास मिळत आहे. उद्भव आटले तरी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणायचे कोठून हा प्रश्न नागरिकांबरोबरच प्रशासनाच्या समोरही उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बीड तालुक्यातील चौसाळा येथे भेट देून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये नागरिकांनी सर्वात प्रथम पिण्याच्या पाण्याची समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. यावरून येथील पाणी पुरवठ्याची यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
भविष्यात आवश्यकता भासल्यास ज्या विहिरींना पाणी आहे त्या विहिरी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)