‘जलसंधारणा’मुळे फुलले शिवार

By Admin | Updated: April 9, 2017 23:37 IST2017-04-09T23:31:39+5:302017-04-09T23:37:02+5:30

शिराढोणसतत दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांची जणू चळवळ उभी राहिली आहे़

'Water conservation', full-blown shiver | ‘जलसंधारणा’मुळे फुलले शिवार

‘जलसंधारणा’मुळे फुलले शिवार

राहुल ओमने शिराढोण
सतत दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांची जणू चळवळ उभी राहिली आहे़ कळंब तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारातील ढोरी नदीपात्राच्या खोलीकरण-रूंदीकरण कामामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यातही विहिरी, कुपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध आहे़ जलयुक्तच्या कामांमुळे या भागातील शिवारही फुलला आहे़
मागील चार-पाच वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाई, चारा टंचाईचा न भूतो न भविष्यती प्रश्नही अनुभवास आला़ दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या़ सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत़ यात सर्वाधिक कामे ही नदी पात्रातील खोलीकरण- रूंदीकरणाची झाली आहेत़ कळंब तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारातील ढोरी नदीपात्रात मागील दोन वर्षात तीन किलोमीटरवर खोलीकरण- रूंदीकरणाचे काम झाले आहे़ गावातील कैलास पाटील, किरण पाटील, सचिन पाटील, हनुमंत सोमासे, रणजित पाटील, राजेश्वर पाटील यांच्यासह इतर शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन लोकवाटा जमा करून सुरू केलेले काम आज या गावासाठी उन्हाळ्यातही संजीवनीसारखे ठरत आहे़ या कामासाठी असलेल्या यंत्रणांवर दोन लाख रूपयांचे डिझेल, खोलीकरण-रूंदीकरणातून निघालेली माती शेतात व इतरत्र टाकण्यासाठी ३२ लाख रूपयांचा खर्च लोकवाट्यातून झाला आहे़ तर शासनाकडून १६ लाखाची मदत मिळाली असून, आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार फंडातून दोन लाखाचा निधी या कामासाठी दिला आहे़ या निधीतून गावच्या शिवारातील ढोरी नदीचे ३ किलोमीटरचे खोलीकरण-रूंदीकरणाचे काम करण्यात आले आहे़ या कामाची रूंदी तब्बल ४२ फूट तर खोली १४ फूट आहे़ गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे या खोलीकरण कामात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता़ तर सध्याच्या भर उन्हाळ्यातही जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी असून, शिवार हिरवागार दिसत आहे़

Web Title: 'Water conservation', full-blown shiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.