बंधाऱ्यातील पाणी बंदोबस्तात सोडणार
By Admin | Updated: July 24, 2014 00:22 IST2014-07-23T23:41:02+5:302014-07-24T00:22:01+5:30
पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून २४ जुलै रोजी नांदेडसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बंधाऱ्यातील पाणी बंदोबस्तात सोडणार
पालम : तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून २४ जुलै रोजी नांदेडसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यात सद्य:स्थितीत २१ दलघमी पाण्याचा साठा आहे. आठ दिवसांपासून पाणी नांदेडला सोडण्यासाठी हालचालींना सुरुवात झालेली आहे. डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडताना वाद होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतलेली आहे. डिग्रस बंधाऱ्यातील मुबलक पाणीसाठा पालम, गंगाखेड व पूर्णा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी गरजेचा आहे. परंतु पाणी सोडण्यासाठी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून फारसा विरोध होत नसल्याने पाणी सोडण्याच्या हालचाली वेगाने झाल्या आहेत. २४ जुलै रोजी नांदेड शहरासाठी ८ दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी सोडताना मागील वेळेस झालेला विरोध या वेळेस होऊ नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. चोख पोलिस बंदोबस्तात बंधाऱ्याचे दरवाजे टप्याटप्याने उघडून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यासाठी पोलिसांची कुमक बाहेरून बंदोबस्तासाठी येणार आहे. स्थानिकांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पाणी सोडताना जबाबदार अधिकाऱ्यांना डिग्रसच्या बंधाऱ्यावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. उपलब्ध पाणी साठ्यापैकी जवळपास ४० टक्के पाणी सोडून देण्यात येणार आहे. यामुळे गोदावरीचे पात्र तळ गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यामध्ये पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
जमावबंदीचे कलम लागू
डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडताना स्थानिकांचा विरोध होऊ नये यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठीच डिग्रस बंधाऱ्यापासून ५०० मीटरच्या आत जमावबंदीचे कलम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या परिसरात स्थानिकांना विरोध करणे कठीण होऊन बसणार आहे. स्थानिकांना एकत्र येता येऊ नये यासाठी ही खेळी करण्यात आलेली आहे. चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याने पाणी सोडताना विरोध होईल की,नाही? हे पाणी सोडतेवेळी समजणार आहे.
पाणीटंचाईचे संकट
डिग्रस बंधाऱ्यातून आठ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे गोदावरीच्या पात्रात कमी प्रमाणात साठवण राहणार आहे. अगोदरच निसर्गाच्या अवकृपेमुळे पाऊस पडलेला नाही. त्यातच हक्काचे पाणी जाणार असल्याने गोदाकाठच्या गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तसेच पाणीटंचाईचे संकट तालुक्यातील घोंगावत आहे.