पाणी उपसा रोखला, २७० विद्युत कनेक्शन तोडले !
By Admin | Updated: July 7, 2014 00:13 IST2014-07-06T23:48:07+5:302014-07-07T00:13:07+5:30
लातूर : लातूर जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे.

पाणी उपसा रोखला, २७० विद्युत कनेक्शन तोडले !
लातूर : लातूर जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू केला आहे. ३ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी आरक्षित करण्यासंदर्भात महसूल प्रशासन व पाटबंधारे विभागांना तातडीच्या सूचना देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. या संदर्भात ‘लोकमत’ने ‘आरक्षित पाण्याचा उपसा सुरू’ या मथळ्याखाली रविवारी वृत्त प्रकाशित केले होते. तसेच विविध ठिकाणच्या प्रकल्पावर सुरू असलेल्या विद्युत मोटारी ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे प्रशासनास दाखवून दिले. या संदर्भात खडबडून जागे झालेल्या महसूल व महावितरणने रविवारी दिवसभरात २७० विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडले आहेत.
लातूर जिल्ह्यात यावर्षी जून लोटला तरी पाऊस पडला नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शिल्लक आहे, अशा ठिकाणचे पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी तातडीची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा यांनी ३ जुलै रोजी सर्व विभागांना दिली होती. तातडीच्या सूचना देऊनही महसूल प्रशासन व महावितरणने याकडे दुर्लक्ष केले होते. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यातून शेतीसाठी दिवसेंदिवस मोठा उपसा होत असल्याने पाणीपातळी घटत होती. रविवारी औसा तालुक्यातील उटी (बु.) येथील तावरजा प्रकल्पावरील ७०, जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी येथील प्रकल्पावरील १०० मोटारींचे विद्युत कनेक्शन महावितरणने तोडले आहेत. तसेच चाकूर तालुक्यातील बोथी प्रकल्पावर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना एक दिवसाची मुदत दिली आहे.
२५० मोटारींचा पुरवठा खंडित...
जळकोट तालुक्यातील ढोरसांगवी प्रकल्पावर शेकडो मोटारींतून शेतकऱ्यांनी पाणी उपसा सुरू केला होता.
दिवसेंदिवस पाणीसाठा घटत असल्याने प्रशासनाकडे नागरिकांनी तक्रार करूनही विद्युतपंपाचे कनेक्शन तोडण्यात आले नव्हते. मात्र ‘लोकमत’च्या वृत्ताने खडबडून जागे झालेल्या महसूल प्रशासनाने रविवारी ढोरसांगवी प्रकल्पावरील विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडण्याच्या सूचना केल्यानंतर महावितरणच्या पथकाने २५० मोटारींचे कनेक्शन तोडले आहेत.
जळकोट तालुक्यात २५० मोटारींचे वीज कनेक्शन तोडून ६० विद्युत मोटारी बाजूला काढण्यात आल्या आहेत.
जप्तीचे आदेश...
चाकूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी बोथी प्रकल्पावर सुरू असलेल्या मोटारी बंद करण्यासंदर्भात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना रविवारी सूचना केल्या आहेत. मंडळ अधिकारी, तलाठी व बोथी येथील पोलिस पाटलाने प्रकल्पावरील मोटारींची पाहणी केली आहे. सोमवारी सर्व शेतकऱ्यांनी आपले विद्युतपंप काढून घ्यावेत, अशा सूचनाही तलाठ्याने दिल्या आहेत. त्यानंतरही प्रकल्पावर पंप आढळून आल्यास जप्त करण्यात येणार आहेत.
६ जनित्रांचा पुरवठा खंडित...
औसा तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पावर असलेल्या सहा जनित्रांचा रविवारी सकाळी विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला. तहसीलदार दत्ता भारस्कर, नगरपालिका, सिंचन विभागाने कारवाई संदर्भात महावितरणकडे पत्र दिले होते. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच रविवारी सकाळपासूनच महसूल यंत्रणा कामाला लागली. तहसीलदारांनी बैठक घेऊन मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पाणीसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच व्हावा. शेतीसाठी होणारा वापर तात्काळ थांबवावा, असे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. उपअभियंता एम.एन. घारोळे, कनिष्ठ अभियंता आर.एम. काळे म्हणाले, महावितरणच्या पथकाने कारवाई सुरू केली आहे. जवळपास ७० विद्युत मोटारींचे कनेक्शन तोडण्यात आले आहेत.