औद्योगिक क्षेत्रातील विहिरीतून पाणी उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST2021-02-05T04:16:32+5:302021-02-05T04:16:32+5:30
शेंद्रा : शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये व्यावसायिक जागेतील विहिरीतून दररोज अवैधरीत्या पाणी उपसा होत असून, त्याचा परिणाम शेजारील ...

औद्योगिक क्षेत्रातील विहिरीतून पाणी उपसा
शेंद्रा : शेंद्रा औद्योगिक वसाहतीमध्ये व्यावसायिक जागेतील विहिरीतून दररोज अवैधरीत्या पाणी उपसा होत असून, त्याचा परिणाम शेजारील विहिरींवर होत असून, पिके धोक्यात आली आहेत. प्रशासाने लक्ष देऊन पाणी उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे.
शेंद्रा वसाहतीच्या सी सेक्टरमधील प्लॉट १३ मध्ये जुनी विहीर असून, प्लॉटधारक उद्योजक या विहिरीतून गेल्या ८ ते १० वर्षांपासून टँकरधारकांना पाणी विकत आहेत. विहीर ही औद्योगिक वसाहतीच्या उर्वरित जमिनीच्या शेजारी आहे. नदीच्या जवळ व मोक्याच्या ठिकाणी असल्याने उतारावरील शेतकऱ्यांना पाणीच पोहचत नसल्याची बिकट स्थिती निर्माण झाली आहे. प्रतिटँकर २५० रुपये दराने हे पाणी विकले जात आहे. प्रतिदिन २० ते २२ टँकर पाणी या विहिरीतून उपसा होत असल्याने शेतीतील गहू, कांदा, ज्वारी, हरभरा, अद्रक, डाळिंब आदी पिके नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. उद्योजकाला शेजारील शेतकऱ्यांनी पाणी उपसा करू नका अशी विनवणी केली; परंतु उद्योजकाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
अन्यथा, कारवाई करू
पाणी उपसाप्रकरणी उद्योजकाला नोटिसीद्वारे सूचित करणार आहोत. त्यांनी उपस थांबवला नाही तर योग्य ती करवाई करण्यात येईल.
-दिलीप परळीकर, उपअभियंता, एमआयडीसी
पिके सुकू लागली
प्रतिवर्षीप्रमाणे या उद्योजकाने याही वर्षी पाणी उपसा चालू केल्याने २ एकरावरील गहू वाळण्याचा स्थितीत आला आहे.
- सुनील तुपे
(शेतकरी शेंद्राबन)
पाणी विक्री थांबवावी, अशी अनेकवेळा विनंती केली; पण ऐकत नाही. जोरदारपणे पाणी उपसा सुरू असल्याने विहीरीचे पाणी आटू लागले आहे. त्यामुळे दीड एकर कांदा पाण्याअभावी गुवतत्तेत येणार नाही. -
संजय तुपे, (शेतकरी शेंद्राबन)
-उद्योजक प्रतिदिन २० ते २२ टँकर पाणी विकत आहे
-प्रतिटँकर ५००० लिटर पाणी
- २२ टँकर उपसा - १ लाख १० हजार लिटर इतके पाणी दररोज उपसा केले जाते.
कॅप्शन...पाणी भरण्यासाठी उभे असलेले टँकर.