सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
By बापू सोळुंके | Updated: September 22, 2024 21:50 IST2024-09-22T21:49:43+5:302024-09-22T21:50:27+5:30
मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला.

सावधान...कोणत्याही क्षणी पैठणच्या जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
छत्रपती संभाजीनगर: पैठण येथील जायकवाडी प्रकल्प ९९.४५ टक्केपेक्षा अधिक भरला आहे. शिवाय पुढील काही दिवस पावसाचे असल्याने जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात कडा प्रशासनाने घेतला. यापार्श्वभूमीवर गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा रविवारी रात्री दिला आहे.
मागील दोन महिन्यात जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्वभागातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील लहान, मोठी धरणे पाण्याने तुडुंब भरली आहे. या दोन्ही जिल्ह्यात आता पावसाचे नवीन थेंब साठविणे शक्य होणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे उर्ध्वभागात पाऊस होताच सर्व पाणी गोदापात्राद्वारे जायकवाडी प्रकल्पात येणार आहे. आज जायकवाडी प्रकल्पात ९९.५० टक्के जलसाठा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यातून गोदापात्रात पाणी सोडण्याचा निर्णय कडा प्रशासनाने घेतला. गोदावरी नदी काठच्या गावातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यापूर्वी १२ दिवस उघडले होते जायकवाडीचे दरवाजे
यापूर्वी पंधरा ते वीस दिवसापूर्वी जायकवाडी प्रकल्पाचे टप्प्या,टप्प्याने १२ दरवाजे उघडले होते. तेव्हा ९ हजार ८०० क्युसेक क्षमतेने गोदापात्रात पाणी सोडण्यात आले होते. नंतर टप्प्या,टप्याने धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले होते. आता पुन्हा पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील गंगापुर,वैजापुर तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शिवाय रिमझिम पाऊसही पडत आहे. प्रकल्प शंभर टक्के भरत आल्याने प्रकल्पातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्याची आवश्यकता पडू शकते. ही बाब लक्षात घेऊन गोदाकाठच्या गावांत कोणतीही हाणी होऊ नये, यासाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. ---समाधान सब्बीनवार. प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण