हजारो लिटर पाणी वाया

By Admin | Updated: March 26, 2016 00:57 IST2016-03-26T00:34:37+5:302016-03-26T00:57:46+5:30

औरंगाबाद : ग्रामीण भागात थेंब-थेंब पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. शहरातील चित्रही फारसे वेगळे नाही.

Waste thousands of liters of water | हजारो लिटर पाणी वाया

हजारो लिटर पाणी वाया


औरंगाबाद : ग्रामीण भागात थेंब-थेंब पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. शहरातील चित्रही फारसे वेगळे नाही. येथील एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठाही आता मनपाने बंद करून तीन दिवसांआड केला आहे. शिवाय वाहने धुणाऱ्यांनाही मनपाने आता दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत; पण दुसऱ्यांना शहाणपणा शिकविणाऱ्या महापालिकेनेच पाणी नासाडीबाबत निष्काळजीपणाचा कळस गाठला आहे. मागील ६ महिन्यांत औरंगपुरा भाजीमंडईतील हजारो लिटर पाणी दररोज नाल्यात सोडण्यात येत असून या पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर शहरातील बागा व उद्योगांना हे पाणी वापरता आले असते.
औरंगपुऱ्यातील जुन्या भाजीमंडईत महानगरपालिकेने व्यापार संकुल उभारण्याचा निर्णय घेतला. येथे वर्षभरापासून पायाभरणीसाठी खोदण्याचे काम सुरू आहे. ३० फुटांपेक्षा अधिक खोल खोदले असता पाणी लागले. दुष्काळाची परिस्थिती असताना येथील मोठा खड्डा पाण्याने भरलेला दिसून येत आहे. येथील पाणी काढण्यासाठी मनपाने चार मोटारी बसविल्या आहेत. ६ महिन्यांपासून २४ तास पाणी उपसा केला जात आहे. या पाण्याचा योग्य वापर करण्याऐवजी मनपा प्रशासनाने हे पाणी थेट नाल्यात टाकण्यास सुरुवात केली. दररोज हजारो लिटर पाणी नाल्यात सोडण्यात येत आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी खाली नहर आहे. सतत मोटार सुरू असल्यास येथे स्वच्छ पाणी येते. रस्त्यावरील भाजी व फळविक्रेता सांडपाणी म्हणून या पाण्याचा वापर करीत आहेत. जुन्या काळी सायफन पद्धतीने येथून पाणी शहरात फिरविले जात होते. ऐतिहासिक नहर फोडण्याचे काम महानगरपालिकेने केल्याचा आरोप होत आहे. औरंगपुऱ्यातील रहिवासी अप्पा कुलकर्णी यांनी सांगितले की, मनपाने लाखो लिटर पाणी नाल्यात सोडले आहे. या पाण्याचा वापर उद्यानासाठी करण्यात आला असता. भाजी विक्रेत्या मीराबाई गायके म्हणाल्या की, ड्रेनेजलाईनद्वारे येथील स्वच्छ पाणी नाल्यात सोडण्यात येत आहे.
सचिन गायकवाड या फळ विक्रेत्याने सांगितले की, एवढे पाणी वाया जात असताना अजूनही महानगरपालिका प्रशासन झोपेत असून येथील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठीही विचार होताना दिसत नाही. दररोज हजारो लिटर पाणी नाल्यात जात असून आता महानगरपालिकेला कोण दंड करणार, असा प्रश्न शहरवासी विचारत आहेत.

Web Title: Waste thousands of liters of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.