कचऱ्याचे वर्गीकरण; नऊ केंद्रांचा प्रस्ताव
By Admin | Updated: August 1, 2016 00:08 IST2016-07-31T23:56:51+5:302016-08-01T00:08:19+5:30
औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमांतर्गत मागील सात ते आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यावर एकानंतर एक प्रयोग करण्यात येत आहेत.

कचऱ्याचे वर्गीकरण; नऊ केंद्रांचा प्रस्ताव
औरंगाबाद : ‘माझी सिटी टकाटक’या उपक्रमांतर्गत मागील सात ते आठ महिन्यांपासून शहरातील कचऱ्यावर एकानंतर एक प्रयोग करण्यात येत आहेत. आता ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी शहरात तब्बल नऊ केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून मांडण्यात आला आहे. ४ आॅगस्ट रोजी मनपा स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. ज्या वॉर्डामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, त्या वॉर्डातील नगरसेवकांनी मागील आठवड्यात ही योजना पूर्णपणे फ्लॉप असल्याचा आरोप केला होता.
शहरातील एकूण ११५ वॉर्डांपैकी ३६ वॉर्डांत ओला व सुका कचरा वेगवेगळा केला जात असल्याचा दावा मनपाने तयार केलेल्या प्रस्तावात आहे. या योजनेमुळे नारेगाव कचरा डेपोकडे जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मनपाचा खर्चही बराच कमी झाल्याचे मनपाकडून वारंवार सांगण्यात येते. सध्या मध्यवर्ती जकात नाका येथे शेडमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागांत ९ ठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी शेड उभारण्याचे नियोजन घनकचरा विभागाने केले आहे. स्मृतिवन उद्यान, सिपेट कंपनी मैदानाजवळ, जाधववाडी कृषी मार्केटजवळ, मजनू हिल, मौलाना आझाद रिसर्च सेंटर, सेंट्रल नाका, विठ्ठलनगर, विश्वभारती कॉलनीत अग्निहोत्री चौकाच्या बाजूला तर सातारा-देवळाई परिसरात एस. आर. पी. कॅम्प याठिकाणी हे केंद्र उभारण्यात यावे, असे प्रस्तावात म्हटले आहे. या उपक्रमासाठी लागणारा खर्च कोण करणार याचा प्रस्तावात कुठेच उल्लेख नाही.