बीडमध्ये धो-धो पाऊस; रस्त्यावर पाणीच पाणी
By Admin | Updated: July 9, 2014 00:27 IST2014-07-08T22:46:36+5:302014-07-09T00:27:36+5:30
बीड: तब्बल महिना उलटल्यानंतर वरुणराजाने रविवार व सोमवारी आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.

बीडमध्ये धो-धो पाऊस; रस्त्यावर पाणीच पाणी
बीड: तब्बल महिना उलटल्यानंतर वरुणराजाने रविवार व सोमवारी आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे. बीड शहरात सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने मुख्य रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. पाण्यातून रस्ता करताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्याला पावसाचे वेध लागले होते. अखेर सोमवारी पहाटे वरुणराजाने आपले आगमन बीड जिल्ह्यात केले. सोमवारी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला. या पावसाने रस्त्यांना तलावाचे स्वरुप आले होते. धो-धो पाऊस पडल्याने अनेकजण पावसाचा आनंद घेताना दिसून येत होते. काही ठिकाणी नाल्या तुंबलेल्या असल्याने रस्त्यावर पाणी आले. रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. त्यामुळे या पाण्यातून रस्ता शोधताना वाहनधारकांची तारांबळ उडत होती. त्यामुळे अनेक दुचाकी, चारचाकी गाड्या पाण्यात बंद पडत होत्या. बंद पडलेल्या गाड्या ढकलताना वाहनधारकांची दमछाक होताना दिसून आले.
शहरातील नगरनाका, शिवाजी चौक, शिवाजीनगर पोलीस ठाणे, सुभाष रोड, स्टेडीयम कॉम्प्लेक्स, सहयोनगर, गजानन मंदिर परिसर, माळीवेस, पेठ बीड, आंबेडकर चौक, पंचशील नगर, मित्रनगर आदी भागात रस्त्यावर पाणी आल्याचे दिसून आले. नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेली मान्सून पूर्व कामे व्यवस्थित न झाल्याने पाणी रस्त्यावर आले. नाल्यांमधील कचऱ्याला पाणी आडून रस्त्यावर आले होते.
पथदिवे बंद असल्याने रस्ता शोधणे झाले अवघड
सुभाष रोडवरील पथदिवे बंद असल्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत असताना नागरिकांचे व वाहनधारकांचे हाल होताना दिसून आले. पावसाने आगमन करताच या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे या भागात सर्वत्र अंधार पसरला होता. सुभाष रोडवरील साठे चौकाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले होते. जास्त पाणी असल्याने दुचाकी, चार चाकी वाहने बंद पडली होती. तसेच या रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार दिसून आला. हे पथदिवे सुरू करावेत व सुभाष रोड भागातील नाल्या सफाई करण्यात यावी, अशी मागणी सुभाष रोड व्यापारी संघटनेच्या वतीने मंगेश लोळगे यांच्यासह इतर व्यापाऱ्यांनी केली आहे.
अनेकांच्या घरात शिरले पाणी
रविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. घरातील पाणी बाहेर काढताना नागरिकांचे हाल होताना दिसून आले. अनेकांनी रात्र जागून काढली. शहरातील नाल्या सफाईची मागणी जोर धरू लागली आहे.