विमान प्रवाशांमध्ये झाली यंदा दुपटीने वाढ
By Admin | Updated: December 14, 2015 23:58 IST2015-12-14T23:53:03+5:302015-12-14T23:58:52+5:30
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दुपटीने वाढ झाली आहे.

विमान प्रवाशांमध्ये झाली यंदा दुपटीने वाढ
औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत दुपटीने वाढ झाली आहे. २०१०-११ मध्ये २ लाखांवर प्रवाशांनी विमान प्रवास केला, तर २०१४-१५ मध्ये तब्बल ४ लाखांवर प्रवाशांनी हवाई सफर केली.
चिकलठाणा विमानतळावरून सध्या औरंगाबाद ते दिल्ली, औरंगाबाद ते मुंबई, औरंगाबाद ते हैदराबाद-तिरुपती आणि हैदराबाद येथून चेन्नई व बंगळुरू अशा हवाई कनेक्टिव्हिटीद्वारे विमानसेवा सुरू आहे. वेरूळ आणि अजिंठा लेणी, शहरातील पर्यटनस्थळे, औद्योगिक क्षेत्र, उद्योगांचा विकास यामुळे विमान प्रवाशांमध्ये वाढ होत आहे. शिवाय चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेकरूंसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे. दरवर्षी ४ हजारांवर हज यात्रेकरू या विमानसेवेचा लाभ घेत आहेत. स्पाईस जेटच्या विमानसेवेने प्रवासी संख्या वाढीस हातभार लावला; परंतु स्पाईस जेटने २०१५ च्या सुरुवातीला विमानसेवा बंद के ली. त्यानंतर जुलै महिन्यापासून ट्रुजेटने तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू केली. तसेच बंगळुरू, चेन्नईसाठीही कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली. विमानतळाचे भव्य टर्मिनल, विमान कंपन्यांची सेवा आणि औरंगाबादचा झालेला मोठा विकास यामुळे विमान प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे, असे विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय म्हणाले.
खाजगी विमानांचेही उड्डाण
चिकलठाणा विमानतळावर खाजगी विमानांचीही ये-जा होते. शिवाय वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी विमानतळावरून उड्डाणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाने प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचे उड्डाण वाढविण्यासाठीही पुढाकार घेतला. प्रशिक्षण देणाऱ्या विमानांचेही गेल्या काही दिवसांपासून विमानतळावरून उड्डाण होत आहे.