वारकरी सांप्रदाय आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडला : नामदेवशास्त्री

By Admin | Updated: April 9, 2015 00:15 IST2015-04-08T23:51:16+5:302015-04-09T00:15:06+5:30

प्रताप नलावडे , बीड बदलत्या काळानुसार वारकरी सांप्रदाय बदलला नाही. आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडल्यामुळे नव्या पिढीला घडविताना त्यांच्यावर संस्कार करण्यात

Warkari community declined due to modernism: Namdev Shastri | वारकरी सांप्रदाय आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडला : नामदेवशास्त्री

वारकरी सांप्रदाय आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडला : नामदेवशास्त्री


प्रताप नलावडे , बीड
बदलत्या काळानुसार वारकरी सांप्रदाय बदलला नाही. आधुनिकतेशी नाळ जोडण्यात कमी पडल्यामुळे नव्या पिढीला घडविताना त्यांच्यावर संस्कार करण्यात हा सांप्रदाय कमी पडला असे सांगतानाच भगवान गडाचे मठाधिपती न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी ज्या कीर्तनकारांनी स्वत:ला आधुनिकतेसोबत जोडले, ते संस्कार देण्याचे काम तळमळीने करत असल्याचे आवर्जून सांगितले. नारळी सप्ताहाच्या निमित्ताने ते लोकमतशी बोलत होते.
समाजात काही अमुलाग्र बदल करायचे असतील तर त्यासाठी वारकरी सांप्रदायाचे माध्यम खूप प्रभावी असल्याचे सांगत नामदेव महाराज म्हणाले, संसार हा सुखाचा होत नाही, असे अगदी स्पष्टपणे सांगणारा हा सांप्रदाय आहे. आमच्याकडे येणारा प्रत्येकजण हा निरपेक्ष भावनेने येत असतो. त्याला काही अपेक्षा नसते. आजच्या कीर्तनकारात काहीजणांनी आधुनिकतेचा स्वीकार केला आहे, परंतु जे जुने कीर्तनकार आहेत, ते हा बदल स्वीकारायला तयार नाहीत. त्यामुळे तरूण पिढीशी त्यांचा संवाद प्रभावी होताना दिसत नाही. कीर्तन हे समाजप्रबोधनाचे खूप प्रभावी माध्यम आहे. आज तंत्रज्ञानात कितीही बदल झाला असला तरी त्याचा कीर्तनावर परिणाम झालेला नाही. म्हणूनच हिंगणी सारख्या छोट्याशा गावात जेव्हा नारळी सप्ताहाचे आयोजन होते, तेव्हा लाखाच्या घरात लोक आजही कीर्तनासाठी आवर्जून येतात.
संत भगवान बाबांनी सुरू केलेली ही नारळी सप्ताहाची परंपरा विशद करताना नामदेव महाराज म्हणाले, ८२ वर्षापूर्वी सप्ताहाची कल्पना बाबांनीच प्रत्यक्षात उतरविली. या सप्ताहाला राज्यभरातून भाविक येतात. एका छोट्याशा गावात संपूर्ण राज्याचे प्रतिबिंब उमटताना पाहिले की या सप्ताहाची उंची आपल्या लक्षात येते. समाजप्रबोधनासाठी सुरू केलेली ही सप्ताहाची परंपरा आजही तशीच सुरू आहे. केवळ कीर्तन आणि भजन इतकेच या सप्ताहाचे स्वरूप नाही तर समाजिक बांधिलकीही जपली जाते.
सामाजिक ऐक्याचा काला !
हिंगणी खुर्द या गावात गुरूवारी सप्ताहाची समाप्ती होत आहे. यावेळी होणारा काला हा खऱ्या अर्थाने सामाजिक ऐक्याचा काला म्हणावा लागेल. लोक सप्ताहाची सुरूवात झाल्यापासून जमेल तशी मदत करत आहेत. आजुबाजुच्या गावातून टेंम्पो भरून भाकरी येतात. या सप्ताहात कोणता धर्म नाही आणि कोणती जात नाही. भेदाभेदच्या पलिकडचे हे सगळे आहे. भगवान गडावर आजवर काहीजणांनी जाणीवर्पूक जातीयतेचे आरोप केले. परंतु भगवान गडाने कधी जात पात पाहिली नाही. समाजासाठी निरंतर काम करत राहणे इतकेच काय ते आम्हाला माहिती आहे, असेही डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. भगवान गडावर आजही १०० विद्यार्थी प्राचीन अध्यात्माचे शिक्षण घेत असून याचवेळी ते प्रचलित महाविद्यालयीन शिक्षणही घेत असल्याचे ते आवर्जून म्हणाले.
भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही
भगवानगडावर सर्वसामान्य भाविकांपासून ते राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी हजेरी लावत असतात. मात्र, ते सर्वजण भक्त म्हणून येतात. भगवानगडापेक्षा कोणीही मोठा नाही, असे सांगून नामदेवशास्त्री म्हणाले, आईला सर्व लेकरं समान असतात. गड कोणा एकाचा नाही तर सर्वसामान्य भाविकांचा आहे.

Web Title: Warkari community declined due to modernism: Namdev Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.