गोदामपालही वाटेकरी
By Admin | Updated: August 10, 2014 23:51 IST2014-08-10T23:42:20+5:302014-08-10T23:51:21+5:30
विजय चोरडिया जिंतूर येथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे

गोदामपालही वाटेकरी
विजय चोरडिया जिंतूर
येथील शासकीय गोदामातील अनागोंदी कारभारात प्रशासनाबरोबरच गोदाम रक्षकही वाटेकरी आहे. दलालाच्या मदतीने क्विंटल मागे दोन किलोच्या फरकाने लाखो रुपयांची कमाई गोदाम रक्षक करीत आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या धान्याची काळ्याबाजारात विल्हेवाट लावण्यास एक प्रकारे मदतच होत आहे.
जिंतूर येथील शासकीय गोदामात होणाऱ्या धान्य घोटाळ्याकडे प्रशासनाने फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मागील पाच वर्षांपासून गोदामातील धान्य काळ्या बाजारात नेणारे रॅकेट कार्यरत आहे. या संदर्भात वेळोवेळी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी करुनही त्यातून फारसे तथ्य बाहेर आले नाही.
शासकीय गोदामात विविध योजनांचा माल आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विशिष्ट वाहनांचा वापर करण्यात येतो. पुरवठा विभागातून परमीट घेण्यापासून ते गोदामातून माल उचलेपर्यंत दलालांची साखळी कार्यरत आहे. दुकानांचे परमीट दलालच हाती घेऊन एकाच वेळी गोदाम रक्षकाकडे परमीट दिले जाते. त्यानंतर पाहिजे त्या वाहनातून माल भरुन पुंगळा, लिंबाळा या भागात धान्याची इतर पोत्यात पलटी करुन हैदराबादकडे माल पाठविला जातो. ही प्रक्रिया करीत असताना दलालांना कशाचीही भिती वाटत नाही. कारण पुरवठा विभाग व पोलिसांना रसद पुरविल्या जात असल्याने तक्रारीकडेही प्रशासन लक्ष देत नाही. त्यामुळे राजरोसपणे धान्याचा काळा बाजार करणाऱ्या साखळीला खतपाणी मिळत असल्याचे दिसते.
विविध योजनेचे दरमाह ५ हजार क्विंटल धान्य गोदामात येते. त्यातून केवळ ४० ते ५० टक्के धान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचते. दरमाह तब्बल अडीच ते तीन हजार क्विंटलचा काळा बाजार केला जातो.
दलाल व दुकानदारांचे चांगभले
अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अडीच हजार क्विंटल धान्य गोदामातून काळ्या बाजारात गेले. गहू दोन रुपये किलो दराने १२०० क्विंटल ज्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये होते. तर तांदुळ १३०० क्विंटल ज्याची किंमत ३ रुपये प्रमाणे ३ लाख ९० हजार रुपये होते. हा दोन्ही माल सहा लाख ३० हजार रुपयांचा असताना दुकानदारांना गहू प्रति किलो ९ रुपये दराने तर तांदुळ ८ रुपये दराने दलाल मोबदला देत असल्याने ६ लाख ३० हजारांचे धान्य दुकानदाराकडून दलाल २१ लाख २० हजार रुपयांना खरेदी करतात. हेच धान्य हे दलाल गहू १४ रुपये किलो दराने व तांदुळ १२ रुपये किलोने हैदराबाद येथे विक्री करतात. यातून ३२ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल होत असून केवळ अडीच हजार क्विंटलमध्ये ११ लाख २० हजार रुपये दलालांच्या खिशात जात आहेत. तर १४ लाख ९० हजार रुपये दुकानदारांच्या खिशात जात आहेत.