भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षाला अटक
By Admin | Updated: September 28, 2014 00:19 IST2014-09-28T00:19:32+5:302014-09-28T00:19:32+5:30
औरंगाबाद : गुटखा बंदीचा आदेश झुगारून गुटखा विकणाऱ्या सिडको एन-३ येथील संदीप प्रोव्हिजनचा मालक शिवाजी शिरसे यास अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली

भाजपाच्या वॉर्ड अध्यक्षाला अटक
औरंगाबाद : गुटखा बंदीचा आदेश झुगारून गुटखा विकणाऱ्या सिडको एन-३ येथील संदीप प्रोव्हिजनचा मालक शिवाजी शिरसे यास अन्न व औषध प्रशासनाच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे. शिरसे हा भारतीय जनता पार्टीचा वॉर्ड अध्यक्ष आहे. तसेच शाळेच्या १०० मीटरच्या आत तंबाखू व सिगारेट विकणाऱ्या अन्य ३ दुकानांवर छापे टाकून माल जप्त केला आहे.
या छाप्यात २३३६ रुपयांचा माल सापडला. या दुकानाचा मालक शिवाजी शिरसे हा भाजपाचा वॉर्ड अध्यक्ष आहे. त्याने पक्षाच्या विविध नेत्यांना फोन करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला; पण अधिकाऱ्यांनी कोणत्याच दबावाला बळी न पडता गुटखा विक्री बंदी कायद्यांतर्गत मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
गुन्हा नोंद होताच पोलिसांनी शिवाजी शिरसे यास अटक
केली. याशिवाय शाळेच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या अन्य तीन दुकानदारांवरही प्रशासनाने कारवाई केली आहे.
यात सिडको एन-३ येथील अजयदीप कॉम्प्लेक्समधील वेदांत प्रोव्हिजनमधून ११ हजार ४९ रुपयांची तंबाखू, न्यू धनेश प्रोव्हिजनमधून ५७८३ रुपयांची व गारखेडा परिसरातील ओम प्रोव्हिजनमधून ४८३६ रुपयांची तंबाखूजन्य उत्पादने जप्त करण्यात आली आहेत. असे एकूण २४ हजार ४०४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. शाळेच्या आवारात तंबाखू विकणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी गजानन गोरे, अमर सोनटक्के आदी सहभागी झाले होते.