वक्फ मंडळच झाले अनाथ!
By Admin | Updated: November 26, 2014 01:11 IST2014-11-26T01:01:18+5:302014-11-26T01:11:47+5:30
मुजीब देवणीकर , औरंगाबाद अल्पसंख्याक समाजातील गोर-गरीब नागरिक, अनाथ मुले, विधवा महिलांच्या पालन-पोषणासाठी वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले

वक्फ मंडळच झाले अनाथ!
मुजीब देवणीकर , औरंगाबाद
अल्पसंख्याक समाजातील गोर-गरीब नागरिक, अनाथ मुले, विधवा महिलांच्या पालन-पोषणासाठी वक्फ बोर्ड स्थापन करण्यात आले. राज्यात ९३ हजार एकर जागेची मालकी असलेल्या वक्फ मंडळाला राज्यात विभागीय कार्यालये स्थापन करण्यासाठी जागाच मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालय औरंगाबादेत आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांना, वक्फ प्रॉपर्टीशी संबंधित पाठपुरावा करण्यासाठी नागरिकांना थेट औरंगाबादेत यावे लागत होते.
राज्यातील वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी दोन वर्षांपूर्वी शासनाने विभागीय कार्यालये सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला. या निर्णयामुळे वक्फ मंडळाचे काम अधिक गतीने होईल, नागरिकांची कामे लवकर होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
राज्यात वक्फ मंडळाच्या २३ हजार ५६६ मालमत्ता आहेत. या मालमत्तांची देखरेख करण्याची जबाबदारी मंडळावर आहे. मंडळाकडे फक्त ५४ कर्मचारी असल्याने एवढा मोठा व्याप सांभाळणे अवघड होऊन बसले आहे. वक्फच्या बहुतांश मालमत्तावर अतिक्रमणे झाली आहेत.
ही अतिक्रमणे पक्की असून मंडळाला ती हटविणे अवघड होऊन बसले आहे. अनेक मालमत्तांसंदर्भात न्यायालयांमध्ये वादही सुरू आहेत. ४
मागीलवर्षी नागपूर येथे तत्कालीन अल्पसंख्याक विकासमंत्री नसीम खान यांनी वक्फ कार्यालयाचे उद्घाटनही केले. याशिवाय अमरावती, पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरांमध्ये कार्यालये सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले होते.
४यासंदर्भात वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सय्यद एजाज हुसैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
४या कार्यालयांना कायमस्वरूपी जागा शोधण्यात येत आहे. लवकरात लवकर जागाही मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.