यश मिळविण्यासाठी सकारात्मकता हवी.!
By Admin | Updated: June 16, 2016 00:05 IST2016-06-15T23:56:30+5:302016-06-16T00:05:30+5:30
जालना : दहावी परीक्षेत यश मिळाले म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी झालात असे नाही. खरे तर आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटनंतरच शुन्यातून नव्याने सुरुवात करावी लागते.

यश मिळविण्यासाठी सकारात्मकता हवी.!
जालना : दहावी परीक्षेत यश मिळाले म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी झालात असे नाही. खरे तर आयुष्याच्या या टर्निंग पॉइंटनंतरच शुन्यातून नव्याने सुरुवात करावी लागते. यश मिळविण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन, स्वत:च्या क्षमता ओळखणे, जिद्द , परिश्रम आणि सातत्य ठेवण्याचा सल्ला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या अन्सार शेख यांनी बुधवारी येथे विद्यार्थी व पालकांना दिला.
जालना शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश राऊत व युवक शाखेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित गुणवंतांच्या सत्कार सोहळयात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री आ. राजेश टोपे, उपनगराध्यक्ष शाह आलम खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.निसार देशमुख, बबलू चौधरी, एकबाल पाशा, नूर खान, जयंत भोसले, नंदकिशोर चव्हाण, महिला आघाडीच्या शकुंतला कदम, शहराध्यक्षा शाजिया शेख, सुरेश खंडाळे, अशोक साबळे, मुख्याध्यापिका खमर सुलताना, मिर्झा अन्वर बेग आदी उपस्थित होते.
अन्सार शेख म्हणाले, आपली स्पर्धा ही दुसऱ्याशी नाही तर स्वत:शी करा. आपल्यातील क्षमता ओळखा परिस्थितीचा उगाचच बाऊ करु नका. कुठलेही यश हे तुम्हाला नवी संधी उपलब्ध करुन देत असते. त्यामुळे यशानंतर जबाबदारी अधिक वाढते. कुणी सांगते म्हणून नाही तर तुमचे मन काय म्हणते ते ऐका. त्यानुसार करिअर घडविण्यासाठी ते क्षेत्र निवडा तरच तुम्ही यशस्वी व्हाल, असे त्यांनी सांगितले. भावनिक प्रज्ञा आणि गुणवत्तेचा विकास झाला तरच यश मिळते. नेहमी नवनवीन शिकायची उमेद राखा, आयुष्यात नेहमीच पाय जमिनीवर असू द्या, कुठलीही गोष्ट शंभर टक्के योगदान देऊन करा, तरच यश तुमचे होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केले तरच जालना जिल्ह्यातून दरवर्षी एक तरी आयएएस अधिकारी तयार होईल, असा विश्वास अन्सार शेख यांनी व्यक्त केला.
डॉ.निसार देशमुख, एकबाल पाशा यांचीही भाषणे झाली. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे राजेश राऊत यांनी प्रास्ताविकात सांगितले. सोहळ्यायाप्रसंगी सभागृह खचाखच भरले होते. छायाचित्र/२