वालुरात डेंग्यूची साथ
By Admin | Updated: September 14, 2014 23:38 IST2014-09-14T23:20:35+5:302014-09-14T23:38:01+5:30
वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे डेंग्यूची लागण झाली आहे़ त्यामुळे गावातील बालके व ज्येष्ठ नागरिक तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत़

वालुरात डेंग्यूची साथ
वालूर : सेलू तालुक्यातील वालूर येथे डेंग्यूची लागण झाली आहे़ त्यामुळे गावातील बालके व ज्येष्ठ नागरिक तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत़ साथीचा आजार गावात फैलावत असतानाही आरोग्य विभाग झोपेत असल्याचे दिसून येत आहे़
वालूर गावामध्ये डासांचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे़ डासांची पैदास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आरोग्य विभागाकडून केले जात नाहीत़ त्यामुळे डासांमुळे ग्रामस्थांना मलेरिया, डेंग्यू आदी आजाराची लागण होत आहे़ याकडे प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी व डास निर्मूलनाचा कार्यक्रम हाती घेऊन डेंग्यू साथरोगावर नियंत्रण करता येईल, मात्र याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ गेल्या आठ दिवसांपासून गावातील बालक व ज्येष्ठ नागरिक तापाने त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे गावातील खाजगी व शासकीय रुग्णालयात रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे़
रुग्णांची संख्या वाढत असतानाही आरोग्य विभाग याकडे डोळेझाक करीत आहे़ एखाद्याचा जीव गेल्यानंतरच आरोग्य विभागास जाग येते की काय, असा सवाल केला जात आहे़ (वार्ताहर)
औरंगाबाद येथे बालिकेवर उपचार
वालूर येथील गौरी रमेश बिऱ्हाडे या बालिकेस आठ दिवसांपूर्वी ताप आली होती़ तिच्यावर वालूर व सेलू येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले़ परंतु, ताप कमी होत नसल्याने या बालिकेस औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तिला डेंग्यूचा आजार असल्याचे निष्पन्न झाले़ तिच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, सध्या तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे़
मोहीम नावालाच
जिल्हा प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावोगाव मोहीम राबविली होती़ परंतु, ही मोहीम कागदोपत्रीच राबविली की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे़