भक्तापूरची विकासाकडे वाटचाल
By Admin | Updated: September 14, 2014 23:36 IST2014-09-14T23:32:00+5:302014-09-14T23:36:36+5:30
रामेश्वर काकडे, नांदेड सर्वंकष विकासाच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून देगलूर तालुक्यातील भक्तापूर या गावाची विकासाकडे वाटचाल सुरु आहे.

भक्तापूरची विकासाकडे वाटचाल
रामेश्वर काकडे, नांदेड
सर्वंकष विकासाच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानाच्या माध्यमातून देगलूर तालुक्यातील भक्तापूर या गावाची विकासाकडे वाटचाल सुरु असून गावाचा कायापालट होत आहे.
या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात चार तर दुसऱ्या टप्प्यात दहा अशा एकूण १४ गावांची निवड केलेली आहे. या योजनेतंर्गत कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला असून त्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. गावातील ७० टक्के लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून जवळपास २० टक्के लोक मजुरी तर ५ टक्के इतर व्यवसाय करतात. ५ टक्के लोक शासकीय व निमशासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत. गावात १ हेक्टरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १६३ तर १ ते २ हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्यांची ११४ तसेच २ ते ५ हेक्टरमधील ४२ तसेच ५ ते १० हे. १८ तर १० ते २० हे. ३ अशी एकूण शेतकऱ्यांची संख्या ३४० एवढी आहे. खरीप पिकाखालील क्षेत्र ४१० तर रबी पिकाखालील क्षेत्र १५९ हेक्टर आहे. गावात ३४ विहिरी असून २१ बोअर तर २८ शेततळे आहेत. यामुळे ५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. कोरडवाहू शेतीला स्थैर्य प्रदान करण्याकरिता कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात येत आहे.
उत्पादकतेत वाढ
यांत्रिकिकरणाद्वारे उत्पादन खर्च कमी करुन उत्पादकता वाढविणे, मूलस्थानी मृद व जलसंधारणासह एकात्मिक पीक व्यवस्थापन, पीक पद्धती, संरक्षित सिंचन, पीक प्रात्यक्षिकाचा प्रचार व प्रसार, सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन सिंचनाची कार्यक्षमता वाढविणे.
शेतकरीभिमुख धोरण
पीके भाजीपाला, चारापिकांचा समावेश करुन किफायतशीर शेती पद्धती विकसित करणे, शेतमालास योग्य भाव मिळण्यासाठी निर्यातक्षम माल तयार करणे, प्रतवारी प्रक्रिया, पॅकिंग, वाहतूक, साठवण इत्यादी सुविधा उभारुन शेतकरीभिमुख कृषिपणन धोरण राबविणे गावातील शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शेतीशाळा अभ्यासदौरे राबविणे हा मुख्य उद्देश आहे. काढणीपश्चात सुविधेतंर्गत ८ शेतकरी गटांना प्रतिगट १०० कॅरेट प्रमाणे ८०० प्लास्टीक क्रेट्स अनुदान तत्त्वावर देण्यात आले. यामुळे विकासाला चालना मिळत आहे.
गावात १५ शेतकरी गटांची स्थापना
गावात १५ शेतकरी गटांची स्थापना केली असून त्यांना सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्रात हंगामनिहाय प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. संरक्षित सिंचन सुविधेतंर्गत अनुदान तत्वावर ७१२ पीव्हीसी पाऊप, दोन पाणबुडी मोटार, एक पेट्रो केरोसीन इंजिन, ठिबक सिचंन संच १४ हेक्टर क्षेत्रावर व १२ तुषार संच देण्यात आले. ठिबक व तुषार संचामुळे बागायती व तसेच भाजीपाला क्षेत्रात १५ ते १६ टक्के वाढ झाली आहे. सिमेंट बंधाऱ्यामुळे ३५ टीसीएम व शेततळ््यामुळे ५ टिसीएम पाणी वाढवून त्यांच्या लगत असलेल्या १५ ते २० हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ झाली़
आधुनिक तंत्रज्ञानामुळे उत्पादकतेत वाढ
कोरडवाहू अभियानाद्वारे सन २०१३-१४ मध्ये रबी पीक प्रात्यक्षिकांत रबी ज्वार १०० एकर, गहू २० एकर, हरभरा २७ एकर यावर प्रात्यक्षिके घेतली. रबी ज्वारीमध्ये रुंदसरी वरंबा पद्धतीने पेरणी केल्यामुळे प्रतिएकरी ६ क्विंटल वरुन ८ क्विंटल उत्पादनात वाढ झाली आहे. गहू प्रात्यक्षिकात एकरी ९ क्विंटलवरुन १२ क्विंटलवर तर हरभरा पिकांत ५ क्विंटलवरुन ८ क्विंटल उत्पादन वाढले. तसेच हरभरा शेतीशाळेद्वारे एकात्मिक शेतीपद्धती राबविल्यामुळे उत्पादनात ५ टक्के वाढ झाली. भाजीपाल्याची नासाडी थांबविण्यासाठी १५ पॅकहाऊस देण्यात आले. त्यामुळे प्रतवारी, पॅकिंग व साठवणूक योग्य प्रकारे करता येणे सोपे झाले आहे. त्यामुळे होणारी नासाडी थांबवून बाजारपेठेत योग्यप्रकारे भाजीपाला पोहोचविणे सोयीस्कर झाले आहे.