पाण्यासाठी तेरा दिवसांची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 3, 2014 00:43 IST2014-06-02T23:46:28+5:302014-06-03T00:43:41+5:30
अंबाजोगाई: शहरात पाण्यासाठी ठणठणाट सुरू असून नळाला पाणी येण्यासाठी शहरवासियांना आता तेरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पाण्यासाठी शहरवासियांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

पाण्यासाठी तेरा दिवसांची प्रतीक्षा
अंबाजोगाई: शहरात पाण्यासाठी ठणठणाट सुरू असून नळाला पाणी येण्यासाठी शहरवासियांना आता तेरा दिवसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने पाण्यासाठी शहरवासियांना वणवण भटकंती करावी लागत आहे. मांजरा धरणातील अपुरा पाणीसाठा त्यातच महावितरणचा खोडा याचा मोठा फटका शहरवासियांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. शहराला सध्या मांजरा धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून मांजरा धरणाने तळ गाठल्याने या धरणावरील सर्वच पाणीपुरवठा योजना संकटात आल्या आहेत. अंबाजोगाई नगर परिषदेने मांजरा धरणात अर्धा कि.मी. अंतराचा चर खोदून व बुडक्या मोटारी धरणात सोडून मृत साठ्यातून पाणी उपसा सुरू आहे. या कामासाठी स्वतंत्र विद्युत वाहिन्या धरणात उभा करण्यात आल्या आहेत. आठवडभरापूर्वी कळंब व केज परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व धरण परिसरातील पोल पडल्याने सलग दोन दिवस विद्युत पुरवठा खंडित राहिला. याचा मोठा फटका पाणीपुरवठ्याला कारणीभूत ठरला. आठवडाभरानंतर मिळणारे पाणी आता तेरा दिवसानंतर मिळणार असल्याने पाण्यासाठी शहरवासियांची वणवण भटकंती सुरू आहे. भीषण ऊन, लग्नसराई, पाहुण्यांची वर्दळ, यातच पाण्याचे असणारे दुर्भिक्ष्य, यामुळे शहरवासियांची मोठी तारांबळ उडू लागली आहे. मुख्याधिकारी रामनिवास झंवर म्हणाले, विद्युत वाहिनीच्या बिघाडामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत आहे, दुरुस्ती करण्यात येईल. (वार्ताहर)