अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्राची दोन वर्षांपासून प्रतीक्षा
By | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:29+5:302020-11-28T04:07:29+5:30
औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण झालेले नाही. दरवर्षी ...

अभियांत्रिकी पदवी प्रमाणपत्राची दोन वर्षांपासून प्रतीक्षा
औरंगाबाद : मागील दोन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण झालेले नाही. दरवर्षी संलग्न महाविद्यालयांचे विद्यार्थी पदवी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यापीठात खेटे घालतात ; परंतु पदवीदान विभागाकडून आज- उद्या, असे सांगून त्यांची बोळवण केली जाते.
यासंदर्भात परीक्षा मूल्यमापन व नियंत्रण विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या पदवीदान विभागाकडे अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अंतिम वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणांचे किर्द (लेजर) जुळत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून अभियांत्रिकी विद्यार्थांना पदवी प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेस अडचण आली आहे. यावर युद्धपातळीवर काम सुरु आहे. यंदा या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वाटप केले जाईल.
तथापि, पदवी प्रमाणपत्र अभावी अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. याकडे विविध विद्यार्थी संघटनांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे लक्ष वेधले. मात्र, विद्यापीठाच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कुलगुरू डॉ. येवले यांंनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र वितरणाचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याबाबत संबंधित विभागाला सक्त ताकीद दिली आहे. त्यानंतर आता कुठे ही अडचण दूर करण्यास पदवीदान विभाग कामाला लागले आहे.
चौकट....
उन्हाळी परीक्षांचा निकालही रखडला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांच्या सोईसाठी ऑनलाईन व ऑफलाईन, अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या. दिवाळीपूर्वी या परीक्षांचा निकाल जाहीर केला जाईल, असा दावाही करण्यात आला होता. मात्र, परीक्षा आटोपून आता पंधरा दिवसांच्यावर कालावधी झाला आहे.पण, अद्याप बीएससी, बीए, बीकॉम, अभियांत्रिकी, एमए, एमएस्सी, एमकॉमच्या दुसऱ्या वर्षांचे निकाल अजूनही जाहीर झालेले नाहीत. महाविद्यालयांकडून ऑफलाईन परीक्षेचा ‘डेटा’ उपलब्ध होत नसल्यामुळे निकाल जाहीर करण्यास अडचण आल्याचे परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी सांगितले.