दर्जेदार जेवणाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: May 22, 2014 00:56 IST2014-05-22T00:44:05+5:302014-05-22T00:56:13+5:30
अशोक कारके, औरंगाबाद औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व सकस जेवण कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे.

दर्जेदार जेवणाच्या प्रतीक्षेत
अशोक कारके, औरंगाबाद औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणार्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व सकस जेवण कधी मिळेल याची प्रतीक्षा आहे. २३ आॅगस्ट १९५८ रोजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते विद्यापीठाची स्थापना झाली. सध्या विद्यापीठात ३८ विभागांत मराठवाडा, खान्देश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह विदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ वसतिगृह बांधू शकले नाही. सध्या विद्यापीठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज वसतिगृह (१),पी. एच. डी. विद्यार्थ्यांसाठी सिद्धार्थ संशोधन वसतिगृह (२), कमवा आणि शिका विद्यार्थी वसतिगृह (३), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वसतिगृह (४), शहीद भगतसिंग संशोधक विद्यार्थी (एम. फिल) वसतिगृह (५) या मुलांच्या वसतिगृहात एक हजार विद्यार्थी राहतात. यापैकी चार वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी मेसची व्यवस्था आहे. शहीद भगतसिंग संशोधक विद्यार्थी (एम. फिल) वसतिगृहातील विद्यार्थ्यांची मेसची सुविधा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. चार वसतिगृहांतील अनेक विद्यार्थी मेसचे जेवण दर्जेदार मिळत नाही म्हणून विद्यापीठाबाहेर जेवणाची सोय करतात. अनेक विद्यार्थ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या तरी प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. वसतिगृहांचे अनेक प्रश्न असले तरी त्यापैकी जेवणाचा प्रश्न तरी सोडवावा, अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. वसतिगृहात राहण्यासाठी विद्यार्थ्याकडून २२०० रुपये वर्षाला, तर मेससाठी दर महिन्याला १२०० रुपये घेतले जात आहेत. त्या बदल्यात अपेक्षित सुविधा दिल्या जात नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.दरमहा १२०० रुपयांत तीन, चार पोळी,भाजी, वरण-भात असतो; परंतु या जेवणाला दर्जा नाही आणि चवही. महिन्यातून दोन वेळा गोड पदार्थ दिला जातो; परंतु जेवणात बदल केला जात नाही. फक्त एक गोड पदार्थ, नंतर मेस बंद होते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. कुलगुरूंचे आश्वासन विरले मेसमध्ये सकस जेवण मिळत नाही, अशा तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली होती. तत्कालीन कुलगुरू विजय पांढरीपांडे यांनी सेंट्रल मेस सुरूकरू, असे आश्वासन तेव्हा दिले होते. ते आश्वासन हवेत विरून गेले. विद्यार्थ्यांना सकस जेवण मिळाल्यास त्यांचे अभ्यासात मन लागेल. - अमिर शेख, एनएसयूआय जेवणाची तपासणी करावी वसतिगृहाच्या मेसचे टेंडर दिल्यानंतर अधिकार्यांनी दरमहा कोणत्याही एका दिवशी मेसमधील पदार्थांची तपासणी करावी. ठरल्याप्रमाणे जेवण दिले जात नसेल, तर मेसचालकावर कारवाई करावी. तुकाराम सराफ, विद्यापीठप्रमुख, भारतीय विद्यार्थी सेनावसतिगृहात राहण्यासाठी वर्षाला २२०० रुपये आणि मेससाठी दरमहा १४०० रुपये भरून उपयोग होत नाही. वसतिगृहात नियमांप्रमाणे सुविधा मिळत नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची बाहेर राहण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसते. विद्यापीठातील गोंधळी कारभारामुळे पैसे भरूनही काही उपयोग होत नाही, असे एका विद्यार्थ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.खासगी मेसमध्ये दरमहा १४०० ते २२०० रुपये मोजावे लागतात. तेथील जेवणात तीन, चार पोळी, भाजी, वरण-भात, कांदा, लिंबू, लोणचे, ठेचा असतो. महिन्यात दोन वेळा गोड पदार्थ किंवा मांसाहारी पदार्थांची फिस्ट दिली जाते.वसतिगृहाच्या मेसमध्ये शुद्ध पाणी, दर्जेदार गव्हाची पोळी, चविष्ट भाजी, चांगल्या दर्जाचा भात, वरण, कांदा, लिंबू, लोणचे, ठेचा असे जेवण असावे अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. महिन्यात दोन वेळा फिस्ट देताना जेवणाच्या पदार्थांत बदल असावा.विद्यार्थी वसतिगृहाच्या मेसमध्ये दर्जेदार व चविष्ट जेवण मिळत नाही म्हणून विद्यार्थी बाहेरच्या मेसमध्ये जेवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ये-जा करण्यात वेळ जातो. कधी कधी जेवणासाठी तासभर थांबावे लागते. नवीन कुलगुरूंनी विद्यापीठ प्रशासनात लक्ष देऊन रखडलेले प्रश्न मार्गी लावावेत. वसतिगृहांची संख्या वाढवून विद्यार्थ्यांना सकस जेवण मिळेल याची काळजी घ्यावी.