२२ वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा !
By Admin | Updated: May 12, 2015 00:51 IST2015-05-12T00:17:49+5:302015-05-12T00:51:45+5:30
लातूर : अवसायनात निघालेल्या लातुरातील ज्योती व इतर ७ यंत्रमाग सहकारी संस्थेतील कामगारांना संस्थेची मालमत्ता विकून वेतन देण्यात यावे

२२ वर्षांपासून न्यायाची प्रतीक्षा !
लातूर : अवसायनात निघालेल्या लातुरातील ज्योती व इतर ७ यंत्रमाग सहकारी संस्थेतील कामगारांना संस्थेची मालमत्ता विकून वेतन देण्यात यावे, असा निर्णय २२ वर्षांपूर्वी कामगार न्यायालय व उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला असतानाही या निर्णयाची अंमलबजावणी नाही़ त्यामुळे गेल्या २२ वर्षांपासून हे कामगार उपासमारीचे जीवन जगत आहेत़ ४ ते ५ कोटी रुपयांचे वेतन थकीतच आहे़ दरम्यान, काही महिन्यांपूर्वी उपनिबंधकांनी जमीन विकण्याची परवानगी दिली आहे़ त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़
लातुरातील ज्योती यंत्रमाग संस्थेअंतर्गत अन्य संस्थेतील एकूण दीड हजार कामगार कार्यरत होते़ संस्थेतील उत्पादन बंद झाल्याने ३१ मार्च १९९८ ला कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले होते़ दरम्यान १९९०-९१ मध्येच ही यंत्रमाग संस्था बंद पडली होती़ जाहीर प्रगटन देऊन कामगारांना कमी करण्यात आले़ त्यामुळे यातील ७० कामगारांनी न्यायालयात धाव घेऊन थकीत वेतनाची मागणी केली़ कामगार न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ३० मार्च १९९३ ला व ७ मे १९९९ ला ज्योती व इतर ७ पॉवरलूम सोसायटीकडून कामगारांच्या थकित वेतन देण्यासंदर्भात निकाल दिला़ २२ वर्षे उलटले तरी कामगारांना थकित वेतन मिळाले नाही़ यातील ७ ते ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे़ न्यायालयाच्या निकालानंतर कामगार प्रतिनिधी दिगंबर नरसिंग टोंपे यांनी ही लढाई सुरुच ठेवली आहे़ सदर सोसायटीची ६ एकर २० आर जमीन शिल्लक आहे़ ही जमीन विकून कामगारांचे थकीत वेतन द्यावे, अशी मागणी आहे़ न्यायालयानेही कामगारांच्या बाजूने निकाल दिलेला आहे़ मात्र प्रशासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप कामगार प्रतिनिधी टोंपे यांनी केला आहे़ न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत कामगार आहेत़ दरम्यान, उपनिबंधकांनी संस्थेच्या जमीन विक्रीला काही महिन्यांपूर्वीच परवानगी दिली आहे़ त्यामुळे कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत़ थकीत वेतन मिळेल या आशेवर कामगार आहेत़ सोमवारी कामगार प्रतिनिधी टोंपे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी तहसीलदारांना निवेदन देऊन थकीत वेतनाची मागणी केली़ ज्योती व इतर ७ पॉवरलूम संस्थेकडून थकीत वेतनाची वसुली करुन संबंधीत कर्मचाऱ्यांना वाटप करण्यासंदर्भात न्यायालयाच्या निकालानंतर एकूण ९ वसुली प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत़ परंतु थकीत वेतन मिळालेच नाही़ वसुलीची कारवाईही झाली नाही़ तहसील कार्यालयाकडे सातत्याने विचारणा करण्यात येते़ परंतु, न्याय मिळत नसल्याचे कामगार प्रतिनिधी टोंपे यांनी सांगितले़ टोंपे यांचे १५ लाखाचे वेतन थकीत असून, सगळ्या कर्मचाऱ्याचे मिळून ४ ते ५ कोटींचे वेतन थकीत आहे़ (प्रतिनिधी)