पशुपालकांना चारा छावण्यांची प्रतीक्षा
By Admin | Updated: April 15, 2015 00:42 IST2015-04-15T00:31:13+5:302015-04-15T00:42:03+5:30
लातूर : अहमदपूर उदगीर, जळकोट, देवणी भागातील चारा संपला असून मागील एक महिन्यापासून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत असतानाही

पशुपालकांना चारा छावण्यांची प्रतीक्षा
लातूर : अहमदपूर उदगीर, जळकोट, देवणी भागातील चारा संपला असून मागील एक महिन्यापासून चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत असतानाही जिल्हा प्रशासनाने कसलीच कार्यवाही केली नाही़ जिल्हा प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे़ या तालुक्यातील पशुधनाला चाऱ्यासाठी मैलोमैल फिरावे लागत आहे़ हिरवा चारा तर नाही, पण वाळलेला चारा सुध्दा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक चिंताक्रांत होऊन चारा छावण्यासुरू होण्याची वाट पहात आहे़
लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ अशा स्थितीत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसेच जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी येताच चारा छावण्या सुरू केल्या जातील असे सांगीतले होते़ त्यानंतर जिल्हा भरातून १३ प्रस्ताव आले असतानाही अद्यापही चारा छावण्या सूरु होत नसल्याने पशुपालक आणि नागरिकांमधून जिल्हा प्रशासनाबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे़ जिल्हा प्रशासन मात्र आमच्याकडे आलेले हे निवेदने आहेत. प्रस्ताव नाहीत, असे सांगून चारा छावणी सुरू करण्याबाबत हात झटकून बघ्याची भूमिका घेत आहे़ जिल्हाभरात लहान पशुधनांची संख्या १ लाख ४४ हजार ९३२ आहे़ या पशुधनास प्रतिदिन ३ किलो प्रमाणे ४३५ मेट्रीक टन चारा लागणार आहे़ मोठ्या पशुधन संख्या ४ लाख ५५ हजार २१८ आहे़ यांना प्रतिदिन ६ किलो प्रमाणे २ हजार ७३१ मेट्रीक टन चारा लागणार आहे़ चाऱ्याअभावी पशुधनाचे मोठे हाल होत आहेत. (प्रतिनिधी)
चारा छावणी सुरू करण्याबाबत सेवाभावी संस्थाचे निवेदने आमच्याकडे प्राप्त झाले आहेत़ अधिकृत स्वरूपाचे प्रस्ताव येताच चारा छावणीला तात्काळ मान्यता देण्यात येतील, अशी माहिती निवासी जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी दिली़
काही सेवाभावी संस्थेने रितसर प्रस्ताव पाठविले आहेत़ जळकोट, उदगीर, अहमदपूर तालुक्यात चारा छावण्या तात्काळ सुरु होणे गरजेचे आहे़, अशी प्रतिक्रिया जि़पग़टनेते रामचंद्र तिरुके यांनी दिली़