पीककर्जाची अद्यापही प्रतीक्षा
By Admin | Updated: May 26, 2014 00:57 IST2014-05-26T00:46:54+5:302014-05-26T00:57:39+5:30
सोनपेठ : तालुक्यातील खरीप पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी तयारी सुरू केली आहे.

पीककर्जाची अद्यापही प्रतीक्षा
सोनपेठ : तालुक्यातील खरीप पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकर्यांनी तयारी सुरू केली आहे. जमिनीच्या मशागती शेवटच्या टप्प्यात असून पेरणीच्या वेळी सावकाराच्या कचाट्यात सापडलेल्या शेतकर्यांना बँकेकडून तातडीने पीककर्ज मिळण्याची प्रतीक्षा आहे. यावर्षी शेतकर्यांनी शेतीतील संकटांना सामोरे जात खरीप हंगामाच्या पीक उत्पादनाचे नियोजन सुरू केले आहे. शेतीतील नियोजन करताना लागणारे पैशांचे नियोजनही करण्यासाठी शेतकर्यांनी खाजगी सावकारांच्या दारात चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. राष्टÑीयीकृत बँकेकडून दिल्या जाणारे अल्प व्याजदरातील कर्ज मिळविण्यासाठी शेतकर्यांनी बँकेकडेही चकरा मारण्यास सुरुवात केली आहे. ऐन पेरणीच्या गडबडीत पीक कर्ज वाटप सुरू होते. त्यामुळे शेतकर्यांना पेरणीकडे पाठ फिरवित बँकेसमोर ठाण मांडावे लागते. शेतीतील पेरणीची वेळ विलंबाने झाल्याने पीक उत्पादनात घट येते. त्यामुळे मे महिन्याच्या १५ तारखेपासून पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे नियोजन बँकेने करणे अपेक्षित होते. परंतु बघू, करु या मोघम उत्तराने शेतकर्यांना पीककर्जासाठी अनेक चकरानंतर प्रतिसाद मिळतो. गतवर्षी बँकेने नवीन शेतकर्यांना पीककर्ज दिले नाही. त्यांच्याकडे कर्ज होते त्या कर्जाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यामुळे बर्याचशा शेतकर्यांना कर्जाचा लाभ मिळाला नाही. पर्यायाने अव्वाच्या सव्वाच्या व्याजदर असलेल्या खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले. गत वर्ष हे शेतकर्यांसाठी संकटाचे वर्ष म्हटले तर वावगे ठरणार नाही़ खरीप हंगामात अतिपावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले होते़ त्यामुळे खरीप पीक शेतकर्यांच्या हाती लागले नाही़ एवढे कमी की काय रबी हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने गहू, ज्वारी, हरभरा यासह फळबागांचे नुकसान झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला़ त्यानंतर शासनाने नुकसान भरपाईचे पंचनामे करून जिल्ह्यातील काही शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली़ परंतु, अद्यापही काही शेतकरी पीक नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ (वार्ताहर) अवघ्या दहा ते बारा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे़ शेतकर्यांनी शेतीची कामे पूर्ण केली आहेत़ आता खरिपाच्या पेरणीसाठी खत, बी-बियाणे घेण्यासाठी शेतकरी घाई करीत आहेत़ परंतु बॅकेकडून वेळेवर कर्ज मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे़सोनपेठ तालुक्यात फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडला़ त्यामुळे आता खरीप पेरणी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेकडे पीककर्ज काढण्यासाठी शेतकरी चकरा मारीत आहेत़ परंतु बँकेकडे चकरा मारूनही कर्ज मिळत नसल्याने आता खरीप पेरणी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी दिसून येत आहेत़