केंद्रीय पथकाची प्रतीक्षा!
By Admin | Updated: November 26, 2014 01:11 IST2014-11-26T01:00:09+5:302014-11-26T01:11:02+5:30
औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा औरंगाबादेत सुरू व्हावी यासाठी मागील काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

केंद्रीय पथकाची प्रतीक्षा!
औरंगाबाद : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शाखा औरंगाबादेत सुरू व्हावी यासाठी मागील काही महिन्यांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शहराजवळील तीन नियोजित जागांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला. अहवालाच्या अनुषंगाने केंद्रीय मानव संसाधन विभागाचे पथक जागेच्या पाहणीसाठी कधी येईल, याची प्रतीक्षा औरंगाबादकरांना आहे.
विख्यात आयआयएमसारखी प्रसिद्ध संस्था औरंगाबाद शहरात आल्यास मराठवाड्याच्या विकासाला आणखी चालना मिळेल, भविष्यातील डीएमआयसी प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून ही संस्था औरंगाबादेत सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
आयआयएमच्या उभारणीसाठी किमान शंभर एकर जागेची गरज असून, मागील दोन महिन्यांपासून जागेची चाचपणी सुरू करण्यात आली होती.
जिल्हा प्रशासनाने मागील आठवड्यात राज्य शासनाला आपला अहवाल सादर केला. अहवालात तीन जागांचा उल्लेख करण्यात आला असून, यामध्ये अब्दीमंडी, करोडी आणि डीएमआयसीचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने तिन्ही जागांची पाहणी करून अहवाल सादर केला. या अहवालाची प्रत प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांना पाठविण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने आयआयएमसाठी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर केंद्र शासनाची टीम शहरात जागेच्या पाहणीसाठी येईल. ही समिती लवकरात लवकर यावी या दृष्टीनेही काही औद्यागिक संघटनांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे औरंगाबादेत आयआयएमला केंद्र शासनाने मंजुरी दिल्यास भूमिपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच यावे, अशीही मागणी औद्यागिक संघटना करीत आहेत.