चार वर्षांपासून इमारतीची प्रतीक्षा
By Admin | Updated: August 3, 2014 01:13 IST2014-08-03T00:35:59+5:302014-08-03T01:13:14+5:30
सेनगाव : तालुकास्तरावर २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सेनगाव येथील प्रथमसत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाला चार वर्षानंतरही न्याय मिळालेला नाही.

चार वर्षांपासून इमारतीची प्रतीक्षा
सेनगाव : तालुकास्तरावर २००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या सेनगाव येथील प्रथमसत्र दिवाणी व फौजदारी न्यायालयाला चार वर्षानंतरही न्याय मिळालेला नाही. न्यायालयाकरिता स्वतंत्र इमारत उभी राहू शकली नसल्याने न्यायालयाचे कामकाज भाड्याच्या जागेतच चालू आहे.
चार वर्षांपूर्वी हिंंगोली जिल्ह्यात सेनगाव व औंढा नागनाथ या दोन तालुक्यांच्या ठिकाणी तालुकास्तरीय न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तात्पुरत्या स्वरुपात न्यायालयाचे कामकाज किरायाच्या जागेत सुरू करण्यात आले होते; परंतु सेनगावबरोबर कार्यान्वित झालेल्या औंढा येथील न्यायालयाला आजघडीला स्वतंत्र इमारत मिळालेली नाही. काही दिवसांपूर्वी न्यायालयाचा दुसरा कक्षही सुरू झालेला आहे. असे असताना सेनगाव न्यायालयाच्या पदरी मात्र निराशा आली आहे. अद्याप न्यायालयाच्या इमारतीकरिता पाच एकर जमीन मिळाली नसल्याने इमारतीचा प्रश्न रखडला आहे. परभणी न्यायिक जिल्हा असल्याने स्थानिक स्तरावर निर्णय होत नाही. सध्या वापरात असलेली इमारत गैरसोयीची असून पक्षकारांना बसण्यासाठी न्यायालयात पुरेशी जागाही नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी अडचणीत बसावे लागते. पक्षकार, वकिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने मोठी अडचण आहे. तालुका वकील संघाचा वतीने इमारतीच्या मागणीकरिता सातत्याने पाठपुरावा सुरू आहे; परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने हा प्रश्न कायम आहे. याकडे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
भाड्याच्या जागेत कामकाज सुरू
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव व औंढा नागनाथ येथे २००८ साली तालुकास्तरावरील न्यायालये स्थापन करण्यात आली.
औंढा नागनाथ येथे स्वंतत्र इमारत उभारण्यात आली. पण सेनगावातील प्रश्न काही सुटलेला नाही.
तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड.केशव भालेराव यांनी अनेकवेळा न्यायालयाच्या इमारतीसंदर्भात मागणी केली आहे.
परभणी येथे निर्णय होत असल्याने याबाबत स्थानिक स्तरावर कार्यवाही नाही
न्यायालयाचा इमारतीकरिता जागेचा शोध घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपविण्यात आली आहे. परंतु या यंत्रणेने गंभीरतेने जागेचा शोध घेतला नसल्याने इमारतीची समस्या कायम आहे.
सद्य:स्थितीत न्यायालयाचा कारभार कार्यरत असलेली इमारत अपुरी पडत आहे.
एकंदर अडचणीत न्यायालयाचे कामकाज चालू असून स्वतंत्र इमारतीचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे.