१८ लाख खड्ड्यांना प्रतीक्षा रोपांची
By Admin | Updated: September 11, 2014 00:42 IST2014-09-11T00:40:31+5:302014-09-11T00:42:02+5:30
रामेश्वर काकडे, नांदेड यंदा शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला विविध विभागामार्फत २६ लाख ५० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.

१८ लाख खड्ड्यांना प्रतीक्षा रोपांची
रामेश्वर काकडे, नांदेड
यंदा शतकोटी वृक्षलागवड योजनेअंतर्गत जिल्ह्याला विविध विभागामार्फत २६ लाख ५० हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले. गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरु असला तरी अद्यापही १७ लाख ८० हजार खड्ड्े रोपांच्या प्रतीक्षेत आहेत.
या योजनेतंर्गत जिल्ह्याला २६ लाख ५५४२८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असले तरी १० सप्टेंबरपर्यंत केवळ २९५०५ रोपट्यांची लागवड झाली आहे. यामुळे यावर्षीही जिल्ह्यात शतकोटी योजनेचा बोजवारा उडाला आहे. मागच्या आठवड्यापर्यंत रोपवाटिकेमध्ये जवळपास २१ लाख रोपटे तयार झालेली आहेत. वाढते प्रदूषण कमी करुन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी या योजनेअंतर्गत शासनामार्फत कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद आदी वेगवेगळ््या विभागामार्फत वृक्षलागवड करण्यात येते. आजपर्यंत जिल्हाभरात १८ लाख ९९५५ खड्डे खोदण्यात आले आहेत. परंतु पाऊस पडूनही लागवडीसाठी प्रशासनाकडून योग्य नियोजन नसल्याने शतकोटी योजना बारगळली आहे. कृषी विभागाला ४ लाख ११३५८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून जवळपास १ लाख ४०२६७ खड्डे खोदले आहेत. तर २७६२१ रोपांची लागवड केलेली आहे.
वनविभागाला ११ लाख ८१३३७ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिलेले आहे. तर १२ लाख ३३००२ खड्डे खोदण्यात आले आहेत. तर जिल्हा परिषदेला १० लाख ७८३९२ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून १ लाख २४४०७ खड्डे खोदण्यात आले आहेत. तसेच सामाजिक वनीकरण विभागामार्फत २ लाख ७५०० रोपट्यांची लागवड करण्यात येणार असून १ लाख ८२३०० खड्डे खोदण्यात आले आहेत. जिल्ह्याला २६ लाख ५५४२८ वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून २२ रोपवाटिकेमध्ये जवळपास २१ लाख रोपे तयार आहेत. मात्र पावसाअभावी लागवडीला ब्रेक लागला आहे.
सध्याचे लागवडीचे चित्र पाहता यावर्षीही शतकोटी योजनेचा बोजवारा उडणार असल्याचेच दिसत आहे़