वाघोबांची आज रवानगी
By Admin | Updated: January 15, 2016 23:55 IST2016-01-15T23:50:23+5:302016-01-15T23:55:58+5:30
औरंगाबाद : मनपाच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या वाघांची एक जोडी घेऊन जाण्यासाठी मध्यप्रदेशातील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयाचे पथक शुक्रवारी शहरात दाखल झाले.

वाघोबांची आज रवानगी
औरंगाबाद : मनपाच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील पिवळ्या वाघांची एक जोडी घेऊन जाण्यासाठी मध्यप्रदेशातील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालयाचे पथक शुक्रवारी शहरात दाखल झाले. त्यामुळे आता नर नकुल आणि मादी दुर्गा यांची उद्या सकाळी पथकासोबत पिंजऱ्यातून रवानगी केली जाणार आहे. हे दोघेही दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थमध्येच जन्मलेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढील महिन्यात मध्यप्रदेशातील सताना येथे नवीन प्राणिसंग्रहालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याच (मुकुंदपूर) प्राणिसंग्रहालयात नकुल आणि दुर्गाचे पुढील वास्तव्य राहणार आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात एकूण ९ पिवळे वाघ आहेत. ही जोडी गेल्यानंतर येथे ७ पिवळे वाघ राहतील. विशेष म्हणजे याआधी मार्च महिन्यातही सिद्धार्थमधून एक पिवळा आणि एक पांढरा वाघ पुणे येथे पाठविण्यात आलेला आहे. वाघांची संख्या जास्त असल्यामुळे सेंट्रल झू अॅथॉरिटीने काही दिवसांपूर्वीच येथून वाघांची एक जोडी मुकुंदपूरला देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वीच मनपाच्या सर्वसाधारण सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय प्रशासनाने मुकुंदपूर प्राणिसंग्रहालय प्रशासनाला हे वाघ घेऊन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तेथील प्राणिसंग्रहालय प्रशासनाचे एक पथक आज दोन पिंजऱ्यांसह औरंगाबादेत दाखल झाले. या पथकात एकूण सात अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी या पथकाचे स्वागत केले. शनिवारी सकाळी पथक वाघांच्या जोडीला घेऊन मध्यप्रदेशकडे रवाना होणार आहे.