वडवणी पोलिसांना नव्या इमारतीची प्रतीक्षा
By Admin | Updated: July 5, 2014 00:37 IST2014-07-05T00:20:20+5:302014-07-05T00:37:16+5:30
बीड/ वडवणी: आगोदरच अपूरी जागा... इमारत आहे पण निजामकालीन... काही खोल्यांवर पत्रे तर काहींवर कौलावर... ऊन असो वा पाऊस बाराही महिने येथील कर्मचाऱ्यांना सारखेच...

वडवणी पोलिसांना नव्या इमारतीची प्रतीक्षा
बीड/ वडवणी: आगोदरच अपूरी जागा... इमारत आहे पण निजामकालीन... काही खोल्यांवर पत्रे तर काहींवर कौलावर... ऊन असो वा पाऊस बाराही महिने येथील कर्मचाऱ्यांना सारखेच... अशा दयनीय परिस्थितीत आज वडवणीच्या पोलिस ठाण्याचे कामकाज चालू आहे. याला कारणीभूत आहे ते सा.बां. विभागाचे दुर्लक्ष आणि गुत्तेदारांचा मनमानी कारभार. यामुळे येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आजही निजामकालीन इमारतीतच काम करण्याची वेळ आली आहे.
गतवर्षी तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी अनेक लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती. प्रत्यक्ष कामास सुरूवातही करण्यात आली. या इमारतीच्या कामासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र वर्ष उलटून गेले तरी या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
सध्या येथील पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना या निजामकालीन इमारतीतच काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे काम अपूर्ण ठेवण्यास केवळ गुत्तेदारच नाही, तर सा.बां. विभागाचाही हात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून व्यक्त केला जात आहे.
कोणत्या कामासाठी किती निधी?
एपीआय यांच्या निवासस्थानासाठी ११ लाख ९८ हजार, कर्मचारी-९० लाख ३५ हजार तर ठाण्याच्या इमारतीस ५० लाख ४० हजाराचा निधी देण्यात आलेला आहे.
वाळू नसल्याने काम बंद
ठाण्याची इमारत आणि अधिकाऱ्यांच्या कॉर्टरचे काम पुर्ण झाले असून दहा दिवसांच्या आत ही इमारत ठाण्याला हस्तांतरित करण्यात येईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी गुत्तेदार वाळू नाही, असे सांगत आहेत, त्यामुळे काम बंद आहे, असे सा.बां.चे शाखा अभियंता आर.जी.लंगे यांनी सांगितले. सपोनी संतोष साबळे म्हणाले या इमारतीत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.