कोरोनाबाधित क्वारंटाईन रुग्णांचे मतदान सर्वांत शेवटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:10 IST2021-01-13T04:10:11+5:302021-01-13T04:10:11+5:30
श्यामकुमार पुरे सिल्लोड : ग्रामपंचायतीच्या आखाड्यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून प्रशासकीय स्तरावर अंतिम तयारी सुरू आहे. तालुक्यातील ३३६ ...

कोरोनाबाधित क्वारंटाईन रुग्णांचे मतदान सर्वांत शेवटी
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : ग्रामपंचायतीच्या आखाड्यासाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून प्रशासकीय स्तरावर अंतिम तयारी सुरू आहे. तालुक्यातील ३३६ मतदान केंद्रांवर महसूल व आरोग्य विभागामार्फत निवडणुकीसाठी येणारे कर्मचारी व मतदारांची तपासणी करून सॅनिटाईज केले जाणार आहे. सिल्लोड शहर व तालुक्यात कोरोनाबाधित, क्वारंटाईन उपचार घेत असलेले सक्रिय रुग्ण १४ आहेत. मात्र, या रुग्णांना मतदान करण्यासाठी काही वेगळी व्यवस्था करण्यात आलेली नाही. या रुग्णांना सर्वांत शेवटी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्यामुळे गावातील एक एक मतदान महत्त्वाचे असल्याने ते करून घेण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय असतात. सध्या सिल्लोड शहरात ५ रुग्ण कोरोनाबाधित असून तालुक्यातील तळवाडा, भवन, हट्टी, निल्लोड येथे प्रत्येकी एक, तर लिहाखेडीत दोन, गेवराई सेमीमध्ये एक असे एकूण विविध गावातील ९ रुग्ण कोरोनाबाधित असून ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार का, तसेच कोण त्यांना मतदानासाठी घेऊन येणार असे प्रश्न सध्या तरी अनुत्तिरत आहेत. मात्र, या रुग्णांना सर्वांत शेवटी मतदान करता येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
--- नियम पाळावे लागणार ----
मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारास मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. मास्क, स्कार्फ, बुरखा यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत बोगस मतदान करण्यासाठी काही उमेदवार प्रयत्न करतील हे बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणेची कसोटी लागणार आहे.
----- महसूल व आरोग्य यंत्रणा सज्ज ----
सिल्लोड तालुक्यातील ३३६ मतदान केंद्र मतदानापूर्वी सॅनिटाईज करण्यात येणार असून महसूल व आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. महसूल विभागामार्फत निवडणूक कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर दिले जाणार आहे. यासह आरोग्य यंत्रणा मतदारांची तपासणी करून त्यांना मतदानासाठी आत सोडणार आहे.
----- क्वारंटाईन रुग्णांसाठी वेळ राखीव नाही ---
तालुक्यात कोरोनाबाधित उपचार घेत असलेले १४ रुग्ण आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून कोणतेही निर्देश नसल्याने प्रशासनाने या बाधित रुग्णाच्या मतदानासाठी कोणताही विशेष वेळ राखीव ठेवलेला नाही, पण या रुग्णांचे सर्वांत शेवटी मतदान करून घेण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. वेळेवर गोंधळ उडू नये म्हणून यावर विचार करण्यात येत आहे.
---- सिल्लोड तालुक्यातील सक्रिय रुग्णांची आकडेवारी
१८ वर्षांवरील क्वांरटाईन १३, सध्या उपचार सुरू असलेले १४, सध्या क्वांरटाईन असलेले १४, एकूण पॉझिटिव्ह १०४०, तालुक्यात एकूण बरे झालेल्यांची रुग्ण संख्या ९९३, कोरोनामुळे मृत्यू ३९.
----- कोट ----
कोरोनाबाधित क्वांरटाईन असलेल्या रुग्णांना सर्वांत शेवटी मतदान करता येईल. त्यांच्यासाठी विशेष असा कोणता वेळ राखीव नाही किंवा तशा सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या नाहीत. बोगस मतदान रोखण्यासाठी संशय आल्यावर मास्क, स्कार्फ, बुरखा काढून खात्री केली जाणार असून तशा यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
- विक्रम राजपूत, निवडणूक निर्णय अधिकारी.