‘नोटा’ बदलणार मतांचा कोटा
By Admin | Updated: October 14, 2014 00:35 IST2014-10-13T22:47:06+5:302014-10-14T00:35:01+5:30
सोमनाथ खताळ, बीड जिल्ह्यातील ११ तालुके मिळून असलेल्या सहाही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी आपल्या अंकगणितातील मतांचा ‘कोटा’ निश्चित केला आहे.

‘नोटा’ बदलणार मतांचा कोटा
सोमनाथ खताळ, बीड
जिल्ह्यातील ११ तालुके मिळून असलेल्या सहाही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी आपल्या अंकगणितातील मतांचा ‘कोटा’ निश्चित केला आहे. मात्र हा कोटा ठरविताना त्यांना ‘नोटा’चा विसर पडल्याचे दिसून येत आहे. हा नोटाचा अधिकार उमेदवारांच्या ठरलेल्या मतांचा कोटा बिघडविणार असल्याचे दिसून येत आहे.
आघाडीतील बिघाडी आणि युतीत झालेला काडीमोड यामुळे आतापर्यंत एकत्र असलेले कार्यकर्ते दुखावले आहेत. यात आणखी भर म्हणून उमेदवारी देताना झालेली घाई आणि काही ठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे पक्षाचे खंदे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांची नाराजी उमेदवारांना प्रचारातून दिसून येत आहे. कार्यकर्ते आणि मतदार यांच्या नाराजीचा सूर ‘नोटा’ च्या माध्यमातून समोर आला तर उमेदवारांनी मतांचे केलेले भाकीत फोल ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातूुन व्यक्त केली जात आहे़ त्यामुळे सट्टाबाजार देखील नेहमीप्रमाणे गरमागरम नाही़ निकालाची रिस्क घेण्यास कोणीही तयार नाही़
अगोदरच आघाडी आणि महायुतीमुळे मतांची विभागणी झालेली होती. मात्र आता पुन्हा यामध्ये फुट झाल्याने आणखी यामध्ये भर पडणार आहे. त्यामुळे नाराज मतदार आणि कार्यकर्ते ‘नोटा’चा अधिकाधिक वापर करण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांमधून वर्तविली जात आहे.
४जर नोटाचा वापर झाला तर अनेक ठिकाणचे निकाल धक्कादायक लागू शकतात, असाही दावा त्यांनी व्यक्त केला आहे. आता किती मतदार या नोटाचा उपयोग करून आपला रोष व्यक्त करतात हे येणारी वेळच ठरवणार आहे, त्यामुळे हे पाहण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागली आहे.